नोव्होकुझनेट्स्क : (स्टालिन्स्क). रशियाच्या रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिकमधील केमेरोव्हो या प्रशासकीय प्रदेशातील (ओब्लास्ट) शहर. लोकसंख्या ५,३०,००० (१९७६). हे केमेरोव्होच्या दक्षिणेस १८५ किमी. व नोव्होसिबिर्स्कच्या आग्नेयीस सु. ३०६ किमी. ट्रान्स–सायबीरियन लोहमार्गशाखेवर टॉम नदीकाठी वसले आहे. जुन्या कुझनेट्स्कची स्थापना टॉम नदीच्या उजव्या तीरावर कॉसॅक टोळ्यांनी १६१७ मध्ये केली. १९२९ मध्ये टॉम नदीच्या डाव्या तीरावर रशियाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आरंभकाळात लोह व पोलाद उद्योगांस सुरुवात झाली व या औद्योगिक विभागाभोवती एक नवीन शहर वसले. यालाच नोव्होकुझनेट्स्क (नवीन कुझनेट्स्क) असे म्हणत. पुढे १९३२ मध्ये कुझनेट्स्क व नोव्होकुझनेट्स्क ही दोन्ही एकत्र करण्यात येऊन स्टालिन्स्क असे नाव देण्यात आले. येथील लोह व पोलाद उद्योगाचा उत्तरोत्तर विकास होत गेल्यामुळे या कारखान्याची गणना रशियातील अशा प्रकारच्या मोठ्या कारखान्यांत होऊ लागली. १९६१ मध्ये यास पूर्वीचेच नोव्होकुझनेट्स्क हे नाव मिळाले. येथे सिमेंट, ॲल्युमिनियम, रसायने, खनिकर्म यंत्रे यांचे अनेक कारखाने असून खनिकर्मशिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयेही आहेत.

सावंत, प्र. रा.