लूइसव्हिल : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी केंटकी राज्यातील जेफर्सन परगण्याची राजधानी व राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,९८,६९४ महानगरीय ९,०६,१५२ (१९८०). ओहायओ नदीवरील धबधब्यांच्या विरूद्ध बाजूस, नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि केंटकी-इंडियाना राज्यांच्या सरहद्दीवर मैदानी भागात हे वसलेले असून धबधब्यांच्या सान्निध्यामुळे याला ‘फॉल्स सिटी’ असेही म्हटले जाते.

व्हर्जिनिया राज्यातील विल्यम अँड मेरी महाविद्यालयाने पाठविलेल्या आयोगांबरोबर कॅप्टन टॉमस बुलिट हा ८ जुलै १७७३ रोजी या ठिकाणी सर्वेक्षणासाठी आला होता. त्यानंतर पेनसिव्हेनिया राज्यातून आलेल्या जॉर्ज रॉजर क्लार्क या समन्वेषकाच्या नेतृत्वाखालील आद्यप्रवर्तकांच्या एका तुकडीने मे १७७८ मध्ये येथील कॉर्न बेटावर वस्ती केली. परंतु पुरांमुळे हे बेट धुऊन गेल्याने तेथील वसाहतकऱ्यांनी या शहराच्या ठिकाणी येऊन वसाहत स्थापिली. दरम्यानच्या काळात येथे एक किल्लाही बांधण्यात आला होता. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्ध काळात (१७७५-८३) फ्रान्सचा राजा सोळावा लूई याने मदत केल्याबद्दल कृतज्ञतेपोटी क्लार्कने या शहरास लूइसव्हिल असे नाव दिले (१७७९). १८०० मध्ये येथे फक्त ३५०, तर १९०० मध्ये २,०५,००० लोक रहात होते. १८२८ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. शहराचा विस्तार १६८ चौ. किमी. असून त्यांपैकी १६ चौ. किमी. क्षेत्र अंतर्गत जलाशयांखाली आहे. लूइसव्हिल महानगरीय क्षेत्र ३,६५२ चौ. किमी.चे असून त्यात बुलिट, जेफर्सन व ओल्डम या केंटकी राज्यातील परगण्यांचा तसेच क्लार्क च फ्लॉइड या इंडियाना राज्यातील परगण्यांचा समावेश होतो.

ओहायओ नदीवरील या प्रमुख बंदराची व्यापारी, औद्योगिक आणि वाहतूक केंद्र म्हणूनही ख्याती आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संदर्भात उत्तर आणि दक्षिण भाग यांच्या सांध्यावर वसलेल्या या शहराला त्याच्या भौगोलिक स्थानाचा फार फायदा झाला आहे. येथील धबधब्यांमुळे शहराचा सुरुवातीचा विकास घडून आला. नदीतील पाण्याची पातळी जेव्हा जास्त असेल, तेव्हाच या धबधब्यांच्या भागांतून जहाजांना ये-जा करता येई. इतर वेळी मालाची वाहतूक धबधब्यांच्या बाजूने करणे, हेच या शहराचे प्रमुख आर्थिक कार्य होते. त्यामुळे या शहराला मालाच्या चढ-उताराचे केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले. १८३० मध्ये धबधब्यांना वळसा घालून जाणारा पोर्टलंड कालवा खणेपर्यंत लूइसव्हिलला या संधीचा फायदा मिळतच राहिला. या कालव्यामुळे ओहायओ नदीतून तिच्या मुखापासून ते पिट्सबर्गपर्यंत थेट वाहतूक होऊ लागली. लोहमार्गांचे जाळे निर्माण झाल्यानंतर आणि नदीतून वाहतूक वाढल्यानंतर शहराला दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून दर्जा प्राप्त झाला. ओहायओ नदीवरील चार पुलांद्वारे लुइसव्हिल हे इंडियाना राज्यातील क्लार्क्सव्हिल, जेफर्सनव्हिल व न्यू ऑल्बनी या शहरांशी जोडलेले आहे. अमेरिकेच्या यादवी युद्धात पश्र्चिमेकडील संघराज्यांच्या आरमाराचे पुरवठा केंद्र म्हणूनही ते नावारूपास आले.

येथील उद्योगधंद्यांत बरीच विविधता आढळते मुख्यतः दुसऱ्या महायुद्धकाळापासून औद्योगिक विकास झपाट्याने झाला. नागरी केंद्र म्हणून आजही त्याची अतिशय जलद गतीने वाढ होत आहे. लूइसव्हिल महानगरीय क्षेत्रात सु. ९०० कारखाने आहेत. १८३०-४० या काळात देशातील केंटकी महत्त्वाचे तंबाखु उत्पादक राज्य व १८४०-५० या दशकात लूइसव्हिल जगातील अग्रेसर तंबाखू प्रक्रिया केंद्र बनले येथील तंबाखूची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. सिगारेटनिर्मितीत हे जगातील अग्रेसर ठिकाणांपैकी एक आहे. व्हिस्कीच्या (मुख्यत: बूरबाँ व्हिस्की) व जिनच्या उत्पादनात शहराचा पुष्कळ वरचा क्रमांक लागतो. येथील व्हिस्की व जिन देशभर वितरित होते. तंबाखूजन्य पदार्थ, कृत्रिम रबर, रसायन उत्पादने, विद्युत् उपकरणे, रंग, बेसबॉल बॅटी, खेळाचे इतर साहित्य, लाकूड चिरकाम, छपाई, ट्रक, ट्रॅक्टर, मोटारी, आणि त्यांचे सुटे भाग, कृषी अवजारे, लोखंडी सामान, लाकडी सामान, ॲल्युमिनियम शुद्धीकरण, ॲल्युमिनियम वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, काचकाम, हवा शुद्धीकरण साधने, अन्नप्रक्रिया  इ. उद्योगधंदे शहरात चालतात. परिसरात पशुपालन व्यवसाय मोठा असल्यामुळे शहरात कत्तलखाने व मांस डबाबंदीकरण व्यवसाय चालतो. नौदलाला लागणाऱ्या बंदुकांचे परिरक्षण केंद्र येथे आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात केंद्र शासनाने तीन मोठे दारूगोळानिर्मिती प्रकल्प येथेच उभारले.

उत्तम रीतीने जोपासलेल्या घोड्यांची ही बाजारपेठ आहे. लूइसव्हिलमधील ‘चर्चिल डाउन्स’ येथे दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला होणारी ‘केंटकी डर्बी’ ही जगातील प्रसिद्ध घोड्यांच्या शर्यतींपैकी एक समजली जाते. ही शर्यत १८७५ पासून येथे होत असून तीत सुमारे एक लाखावर लोक भाग घेतात. दरवर्षी ऑगस्टमध्ये भरणाऱ्या केंटकी राज्यजत्रेमध्ये घोड्यांचे व इतर प्राण्यांचे प्रदर्शन भरविले जाते. दक्षिण भागासाठीचे हे प्रमुख घाऊक वितरण केंद्र आहे. शहरात विमा व वित्तविषयक पेढ्या असून त्यांची शहराच्या वाढीस खूप मदत झाली आहे.

शैक्षणिक दृष्ट्याही लूइसव्हिल महत्त्वाचे आहे. लूइसव्हिल विद्यापीठ (स्थापना १७९८), सिमन्झ विद्यापीठ, स्पॉल्डिंग (१८२९), बेलार्मीन (१९५०), जेफर्सन कम्यूनिटी (१९६७) ही महाविद्यालये लूइसव्हिल प्रेस्बिटेरियन, सदर्न बॅप्टिस्ट, सेंट टॉमस यांसारख्या धर्मशास्त्रविषयक पाठशाळा, इ. शैक्षणिक संस्था शहरात आहेत. येथील रोमन कॅथलिक पंथीय पाठशाळा प्रसिद्ध आहे. शहरातील लूइसव्हिल सार्वजनिक ग्रंथालय (स्थापना १८१६) हे देशातील प्रसिद्ध सार्वजनिक ग्रंथालय असून त्याच्या आठ शाखा व २१ उपशाखा आहेत. केंटकी स्कूल ही अंधशिक्षणसंस्था आहे. ‘अमेरिकन प्रिंटिंग हाउस’ ह्या अंधांसाठीच्या ब्रेल प्रकाशनांची छपाई करणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या छापखान्याची १८५८ मध्ये येथे स्थापना झाली असून अंधांसाठी शैक्षणिक साधने तयार करण्याबाबत या शहराची जगात ख्याती आहे.

सांस्कृतिक व मनोरंजन केंद्र म्हणूनही शहराचा लौकिक आहे. त्या संदर्भातील अनेक संस्था शहरात आढळतात. शहरात सु. ५०० चर्च आहेत. लुइसव्हिलमधून १४ नभोवाणी केंद्रे व पाच दूरचित्रवाणी केंद्रे आपले कार्यक्रम प्रसारित करतात. राज्यातील जवळजवळ २० टक्के लोकसंख्या लूइसव्हिल महानगरीय प्रदेशात आहे. नवीन वस्ती दक्षिणेकडील व पूर्वेकडील जंगलविरहित टेकड्यांवर पसरली आहे. ओहायओ नदीच्या काठाला लागून तसेच शहरात अनेक सुंदर बगीचे आढळतात, त्याचबरोबर खेळाची सुसज्ज मैदानेही पहावयास मिळतात. शहरातील जे. बी. स्पीड कला संग्रहालय, केंटकी लोहमार्ग संग्रहालय, फिल्सन क्लब, गायनविषयक वाद्यवृंद, केंटकी ऑपेरा असोसिएशन, ॲक्टर्स थिएटर ऑफ लूइसव्हिल, राउच खगोलालय इ. संस्था उल्लेखनीय आहेत. १८९० मधील विनाशकारी झंझावातामुळे तसेच १९३७ मध्ये ओहायओ नदीला आलेल्या पुरामुळे शहराची बरीच प्राणहानी व वित्तहानी झाली. त्यामुळे केंद्र शासनाने शहराजवळ पूरसंरक्षक भिंत बांधलेली आहे. लूइसव्हिलच्या नैर्ॠत्येस ५० किमी.वर असलेल्या èफोर्ट नॉक्स १९३२ पासून कायमस्वरूपी लष्करी तळ असून १९३६ पासून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे येथे सुवर्णसंचयाचे कोठार आहे. 

फडके, वि. शं. चौधरी, वसंत