विल्क्स-बॅरे : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्याच्या ईशान्य भागातील लुझर्ने परगण्याचे मुख्य ठिकाण आणि एक औद्योगिक शहर. लोकसंख्या ४७,५२३ (१९९०). न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया यांच्या वायव्येस अनुक्रमे २१७ किमी. व १६३ किमी. अंतरावर, सस्क्केहॅना नदीच्या पूर्व तूरावर हे शहर वसले आहे. ब्लूत पर्वतश्रेणीतील इतिहासप्रसिद्ध व निसर्गसुंदर अशा वायोमिंग खोऱ्यात हे शहर आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धकाळात अमेरिकेतील वसाहतींबाबत सहानुभूती दाखविणारे ब्रिटिश पार्लमेंटचे सभासद जॉन विल्क्स व आयझॅक बॅरे यांच्या सन्मानार्थ या शहराला विल्क्स-बॅरे हे नाव देण्यात आले.

विल्क्स-बॅरेची मूळ स्थापना १७६९ सस्क्केहॅना कंपनीने केली. त्याच वर्षीच्या वसंत ऋतूत कनेक्टिकटमधील नॉर्विच येथून एका गटासह मेजर जॉन डर्की या ठिकाणी आला. त्याने येथे आपली वसाहत स्थापन केली व ‘फोर्ट डर्की’ हा किल्ला (मेढेकोट) बांधला. त्याच्या या जागेवरील अधिकाराला पेनसिल्व्हेनियन लोकांनी आव्हान दिले. भूप्रदेशाच्या हद्दीवरूनच पेनसिल्व्हेनिया व कनेक्टिकट वसाहतकऱ्यांमध्ये युद्ध सुरू झाले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धकाळात ३ जुलै १७७८ रोजी एकदा व त्यानंतर दुसऱ्या यांकी-पेनअमाइट युद्धात जुलै १७८४ मध्ये दुसऱ्यांदा, असे दोन वेळा ब्रिटिश व अमेरिकन इंडियन यांच्याकडून विल्क्स-बॅरे जाळ्यात आले. १७८६ मध्ये हे परगण्याचे मुख्य ठाणे बनले. १८०६ मध्ये याला ‘बरो’चा व १८७१ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. सांप्रतच्या महानगरात लगतच्या सु. तीस नगरपालिकांचा समावेश होतो.

विल्क्स-बॅरेच्या आसमंतात अँथ्रॅसाइट कोळशाची विस्तृत क्षेत्रे असल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे कोळसा उद्योगाच्या विकासास सुरूवात झाली. त्यामुळे वाहतूक सुविधांमध्ये वाढ होऊन शहराचा विकास घडून आला. इंधन म्हणून कोळशाचा वापर कमी होऊ लागल्याने १९४० पासून येथील कोळसा उद्योगाचा ऱ्हास होत गेला. परंतु अर्थव्यवस्थेत विविधता निर्माण होत गेली. सिगार, पोलादी तार, सुरूंगदारू, लाकडी सामान, कपडे, पादत्राणे, काच, बाष्पित्र, खेळणी, दूरचित्रवाणी व रेडिओचे सुटे भाग, पेन्सिली, रेल्वे एंजिने, विमानांचे सुटे भाग, अवजड यंत्रसामग्री, तेलशुद्धीकरण उपकरणे, इलेक्ट्रॉनिकी साहित्य, टायरनिर्मिती इत्यादींचे कारखाने येथे आहेत.

विल्क्स कॉलेज (१९३३), किंग्ज कॉलेज (१९४६), कॉलेज मिझेरिकॉर्डिआ (१९२४), वायोमिंग हिस्टॉरिकल व जिऑलॉजिकल सोसायटी, ऑस्टरहट फ्री लायब्ररी, पेनसिल्व्हेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीची शाखा (१९१६), लुझर्ने काउंटी कम्यूनिटी कॉलेज (१९६६) या शैक्षणिक संस्था येथे आहेत. येथील विल्क्स व बॅरे यांची स्मारके उल्लेखनीय आहेत. दरवर्षी मे महिन्यात येथे तीन दिवस खुला ललित कला उत्सव भरतो. वायोमिंग युद्धाचा स्मरणोत्सव येथील वायोमिंग स्मारकाजवळ दरवर्षी तीन जुलैला भरतो. विल्क्स -बॅरे किल्ला, क्कीन एस्टर रॉक, फॉर्टी फोर्ट (१७७०), ओल्ड फेल हाउस, स्वेटलँड होमस्टेड ही येथील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. शहरात सिंफनी वाद्यवृंद, घोड्यांच्या शर्यतींचे मैदान इ. करमणुकीची साधने आहेत. सस्क्केहॅना नदीच्या पुरामुळे जून १९७२ मध्ये शहराचे प्रचंड नुकसान झाले होते. हाव्ही सरोवर व पोकानो पर्वत ही याच्याजवळची प्रेक्षणीय स्थळे आहेत.

चौधरी, वसंत