ग्लेंडेल : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेल्सचे उत्तरेकडील उपनगर. लोकसंख्या १,३२,७५२ (१९७०). हे सॅन फर्‌नँदो खोऱ्यात १८८६ मध्ये वसविले गेले. येथे विमाने, विमानांची एंजिने, खनिज तेलपदार्थ, यंत्रे, सिमेंट, रसायने, नेत्रीय उपकरणे, औषधे, काच, प्लॅस्टिक इत्यादींचे कारखाने आहेत. ग्लेंडेल महाविद्यालय, कॅल-एअरो टेक्निकल इन्स्टिट्यूट, नगर प्रेक्षागृह, ब्रँड उद्यान, प्रसिद्ध कलाकृतींच्या प्रतिकृती असलेले फॉरेस्ट लॉन पार्क, कलावीथी इ. शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत. राजमार्ग, महामार्ग, लोहमार्ग, विमानतळ यांच्या सोयी आहेत.                       

लिमये, दि. ह.