मस्कत : अरबस्तानच्या आग्नेय सागरकिनाऱ्यावरील ओमान देशाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ५०,००० (१९८१ अंदाज). हे अल् हाद भूशिराच्या वायव्येस १७७ किमी. अंतरावर ओमान आखातावर वसलेले आहे. इराणच्या आखाताच्या दक्षिणेकडील प्रवेशाच्या दृष्टीने हे मोक्याच्या ठिकाणी आहे. या शहराच्या आसमंतात डोंगर असल्याने अरबस्तानच्या अंतर्गत भागाशी दळणवळण दुष्कर ठरते, तथापि पश्चिमेकडील ‘मात्रा’ या उपनगरापासून अंतर्गत भागाशी दळणवळण सुलभ आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

 

 

पोर्तुगीजांनी अफांसो द अल्बुकर्क याच्या नेतृत्वाखाली १५०८ मध्ये मस्कतचा ताबा घेतला परंतु पोर्तुगीजांचे हॉर्मझ सामुद्रधुनीवरील आधिपत्य नाहीसे होईपर्यंत (१६२२), मस्कतचा विकास झाला नाही. त्यानंतर मात्र हे पोर्तुगीजांचे या विभागातील प्रमुख केंद्र बनले त्यांनी येथे नाविक तळही उभारला. १६४८ नंतर ते पर्शियनांच्या सत्तेखाली आले. १७४१ मध्ये हे सय्यद घराण्याच्या अंमलाखाली आले. सय्यद इब्न सुलतानच्या कारकीर्दीत (१८०४-५६) मस्कतच्या विकासास वाव मिळाला. याच्याजवळील मात्रा हे बंदर चांगल्या दळणवळण सुविधांनी देशांतर्गत भागाशी जोडलेले आहे, त्यामुळे बराचसा व्यापार मात्रा बंदरातून चालतो. येथे प्रामुख्याने बलुची, भारतीय, निग्रो, अरब इ. लोकांचे वास्तव्य आहे. येथून खनिज तेल, सुका मेवा, खारवलेले मासे, मुक्ताद्रव्य, खजूर यांची निर्यात तर गहू, तांदूळ, कॉफी, साखर, कापड इत्यादींची आयात केली जाते.

 

लिमये, दि.ह. गाडे, ना. स.