ला पास  : बोलिव्हियाच्या पश्चिम-मध्य विभागात वसलेले याच नावाच्या विभागाचे तसेच देशाच्या प्रशासकीय राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १०, ३३, २८८ (१९८६). सस. पासून ३,६६० मी. वरील हे शहर जगातील सर्वांत उंचीवरील मोठी राजधानी म्हणून ओळखली जाते. सूक्रे ही देशाची अधिकृत राजधानी असली, तरी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान,  विधिमंडळ सभागृह व सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये ला पास येथेच आहेत. तितिकाका सरोवराच्या आग्नेयीस ६८ किमी.  अंतरावर,  ला पास नदीच्या खोऱ्यात याचा विस्तार झाला आहे. आल्ती प् लानो पठाराच्या पृष्ठभागापासून सु. ४२५ मी.  खोल आणि कॉर्डिलेरा रेआल पर्वतश्रेणीने वेढलेले असल्याने थंड वाऱ्यांपासून यांचे संरक्षण होते. 

इ. स. १५४० मध्येफ्रांथीस्को पिझारो याने या स्थळास प्रथम भेट दिली होती.  त्यानं तर ते चो क्वे यापू या नावाने एक इंका खेडे म्हणून ओळखले जाऊ लागले. पेरूमधून आलेल्या अलान्सो दी मेनदो सा या स्पॅनिश कॅप्टनने चो क्वे यापू नदीकाठी या इंका खेड्याच्या जागी १५४८ मध्ये सध्याच्या शहराची स्थापना केली. त्यावेळी याचे नाव नूएस्त्रा सेनोरा दे ला पास (अवर लेडी ऑफ पीस) असे होते स्पॅनिश भाषेत ला पास म्हणजे शांतता  पण अनेक युद्धे आणि अंतर्गत बंडाळी यांनी या शहराचा इतिहास घडलेला आहे. स्पॅनिश व इंडियन यांच्यात झालेल्या युद्धांचे हे मुख्य केंद्र होते. देशाच्या स्वातंत्र्य युद्धातही या शहराचा मोठा वाटा आहे. मे १८०९ मध्ये येथूनच स्वातंत्र्य चळवळीस सुरुवात झाली. स्पॅनिश गव्हर्नरविरूद्ध लढा देऊन पेद्रो दो मिं गो मुरिलो याने व त्याच्या अनुयायांनी या गर्व्हनरला ला पास येथे कैद केले होते, पण मुरिलो आणि त्याच्या अनुयायांना लवकरच अटक करण्यात आली आणि स्पॅनिश सत्तेची येथे पुनःस्थापना झाली. जानेवारी १८२५ मध्ये स्पॅनिशांनी ला पासवरील ताबा सोडला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शहराचा ताबा घेतला. शेवटच्या निर्णायक स्वातंत्र्य युद्धाच्या स्मृतिप्रित्यर्थ शहराला ला पासदे आयाकूचो हे नाव देण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सूक्रे ही राजधानी दुर्गम असल्याने १८९८ पासून ला पास ही शासकीय राजधानी करण्यात आली. 

आयमारा इंडियन लोक शहरात बहुसंख्येने असून मेस्तिझो लोकांचीही व सती आहे. येथील हवामान थंड आणि कोरडे असून वार्षिक सरासरी तापमान १५° से. असते. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पाऊस पडतो. बाकीचे दिवस हवामान स्वच्छ असते. 

लोह, सोने, अँटिमनी, जस्त, खनीज तेल, तांबे व टंगस्टन ही शहराच्या परिसरातील महत्त्वाची खनिजे आहेत. शहरात कापड, लोकर व पादत्राणे, काच, कागद, आणि फरश्या  यांचे कारखाने असून बीर, डबाबंद खाद्यपदार्थ, सिमेंट, कातडी कमावणे यांचे उद्योगही चालतात. ला पास येथे देशातील दोन-तृतीयांश निर्मिति उद्योग केंद्रित झाले आहेत.  बोलिव्हियाच्या चार मोठ्या लोहमार्गांवरील हे स्थानक असून ते पेरू,  चिली,  अर्जेंटिना, ब्राझील येथील प्रमुख बंदरांशी लोहमार्गाने  जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने सूक्रेपेक्षा याची वेगाने प्रगती झाली आणि हे देशातील महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक केंद्र बनले. 

शहराच्या मध्यभागी प्लाझा मुरिलो  (पेद्रो दो मिं गो मुरिलोच्या स्मरणार्थ) हा फुलझाडांनी सुशोभित केलेला असून रोमन कॅथीड्रल, मोठमोठ्या शासकीय कार्यालयांच्या इमारती, जुन्या वसाहतकालीन इमारती, जुने अरूंद रस्ते, लाल कौलारू घरे आणि पार्श्वभूमीवर कॉर्डिलेरा रेआलची हिमाच्छादित शिखरे यांनी ला पासच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र असून येथे सु. पन्नास हजार प्रेक्षकांची सोय असलेले व पोहण्याचा तलाव असलेले भव्य क्रीडागार आहे. १८३० मध्ये स्थापन झालेले सान आंद्रेस विद्यापीठ व लष्करी विद्यालय या उच्च शैक्षणिक सुविधां व्यतिरिक्त शहरात राष्ट्रीय कलावस्तुसंग्रहालय आणि दोन अत्याधुनिक संशोधन संस्था आहेत. त्यांत पठारी प्रदेशातील प्राणी व वनस्पतीजीवन यांविषयी संशोधन केले जाते. दरवर्षी ६ ऑगस्टला येथे देशाच्या काँग्रेसचे अधिवेशन तसेच जानेवारी महि न्यात चूल आणि घराचे प्रतीक असलेल्या एकेको देवाची जत्रा भरते .

 पंडित,  भाग्यश्री