छत्री खडक वाऱ्याच्या कार्याने प्रामुख्याने वाळवंटात आढळून येणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला छत्री खडक म्हणतात. या खडकाचा वरचा भाग रुंद व बहिर्वक्र, मधला भाग चिंचोळा आणि खालचा पाया थोडासा रुंद असतो. वाऱ्यामुळे वाळूचे कण खडकाच्या मधल्या भागावर आपटतात व घर्षण होऊन तो भाग झिजून चिंचोळा होतो. तळभागावर व वरच्या भागावर घर्षणाचा फारसा परिणाम होत नाही. कारण जमिनीशी घर्षण होऊन वाऱ्याचा जोर तळाजवळ कमी झालेला असतो व वाळूचे कण जड असल्यामुळे ते फारसे उंचही उचलले जात नाहीत. सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खडकाचा मध्यभाग खूपच बारीक होतो. खडकाचे रूप अशाप्रकारे पालटून त्याला पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राचा आकार प्राप्त होतो. कालांतराने वरील भागाचे वजन सहन न झाल्यामुळे खडक मध्यभागी मोडतो व कोलमडून पडतो.

 डेथ व्हॅलीतील छत्री खडक, दक्षिण कॅलिफोर्निया

करमरकर, प्र. र.