परताबगढच्या पारंपरिक कलाकामाचे नमुनेपरताबगढ : राजस्थान राज्याच्या चितोडगढ जिल्ह्यातील परताबगढ तालुक्याचे व पूर्वीच्या परताबगढ संस्थानच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १७,४०२ (१९७१). हे उदयपूरच्या आग्नेयीस सु. १२५ किमी., रतलाम–चितोडगढ या पश्चिम लोहमार्गफाट्यावरील मंदसोर स्थानकाच्या पश्चिमेस सु. ३२ किलोमीटरवर समुद्रसपाटीपासून ५०६ मी. उंचीवर वसले आहे. महारावत प्रतापसिंग याने १६९८ मध्ये हे गाव वसविले. त्याच्या नावावरूनच यास ‘परताबगढ’ हे नाव पडले असावे. हा किल्ला मजबूत असून महारावत सालिमसिंग याने १७५८ मध्ये याच्याभोवती तट बांधला. या तटास सूरज पोळ, भाटपुरा, बाटी, धाय, देवलिया व धमोतर या नावांचे सहा दरवाजे आहेत. काचेवर कोरीवकाम करून त्यास सोनेरी मुलामा देऊन पौराणिक व शिकारीची रंगीत दृश्ये तयार करण्यात परताबगढ प्रसिद्ध होते. येथील राजवाडा आणि अनेक हिंदू व जैन मंदिरे तसेच मशिदी प्रेक्षणीय आहेत. पासवान अलारखी बाईच्या मशिदीची वास्तू भव्य आहे. शहराच्या बाहेर दीपनाथाचे मंदिर आहे. शहरात नगरपालिकेशिवाय टपाल व तारगृह, दवाखाना, प्राथमिक व माध्यमिक शाळा, राजस्थान विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय इ. सोयी आहेत. याच्या आसमंतात होणाऱ्या मका, कापूस आणि गहू इ. शेतमालाच्या बाजारपेठेचे परताबगढ केंद्र असून, सरकी काढणे व हात मागावर कापड विणणे हे येथील उद्योगधंदे आहेत.

सावंत, प्र. रा.