जॉर्डन : अल्‌ मामलाका अल् उर्दुनीया अल्‌ हशमिया. नैर्ऋत्यआशियातील एक अरब देश. क्षेत्रफळ ९५,५९४ चौ. किमी. लोकसंख्या २३,४८,००० (१९७१). याच्या उत्तरेस सिरिया, पूर्वेस इराक व सौदी अरेबिया, आग्नेयीस व दक्षिणेस सौदी अरेबिया आणि पश्चिमेस इझ्राएल आहे. राजधानी अम्मान. दक्षिणेस अकाबाच्या आखातावर जॉर्डनला सु. १९ किमी. किनारा असून तेथे त्याचे एकमेव बंदर अकाबा आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व व पश्चिम तीरांवर वसलेला असून पश्चिम सीमा जेरूसलेम शहरातून जाते. १९६७ च्या अरब-इझ्राएली युद्धानंतर जेरूसलेमसह पश्चिम तीरावर  ५,८७९ किमी. चा सर्व प्रदेश इझ्राएलने व्यापला आहे. यात जॉर्डनचा सु. ६% प्रदेश व त्याच्या शेतीप्रदेशापैकी सु. २५% प्रदेश गेला आहे.

भूवर्णन : जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावरील प्रदेश, त्याच्या पूर्वेकडील वाळवंटी प्रदेश, पश्चिम तीरावरील प्रदेश व जॉर्डन खचदरी असे जॉर्डनचे चार स्वाभाविक विभाग होतात. पूर्व तीरावरील पठारी प्रदेश पूर्वेकडे उतरता होत गेलेला असून त्याची नदीकडील बाजू तुटलेल्या कड्यासारखी आहे. त्याची दक्षिणेकडील उंची सु. १,७५० मी. उंच असून त्यात जेबेल राम्म हे १,७५४ मी. उंचीचे शिखर आहे. या प्रदेशाची सरासरी उंची ६०० ते ९०० मी.आहे. त्यात वालुकाश्म, खडू, चुनखडक, गारगोटी यांचे दृश्यांश असून अगदी दक्षिणेस अग्निजन्य खडक आहेत. उत्तरेकडील बारमाही प्रवाह पश्चिमेकडे जातात, तर दक्षिणेकडील खंडित प्रवाह अल् जाफर या खोलगट भागाकडे जातात.

पूर्व तीर प्रदेशाच्या पूर्वेस जॉर्डन नदीच्या पूर्वकडील जॉर्डनच्या प्रदेशाचा ८०% भाग व्यापणारे वाळवंट आहे. हा वाऱ्याने झिजलेला प्रदेश असून याचा उत्तर भाग लाव्हा व बेसॉल्ट यांचा व दक्षिण भाग वालुकाश्म व ग्रॅनाइट यांच्या दृश्यांशांचा आहे.

पश्चिम तीरावरील पठारी प्रदेश सरासरी ९०० मी. उंचीचा असून त्यातून पूर्वेकडे खोल निदऱ्या व पश्चिमेकडे मोठी खोरी गेलेली आहेत. त्यांत कित्येक जागी गाळाची सुपीक मैदाने आहेत. तेथे वालुकाश्म, चुनखडक, खडू इ. आहेत.

जॉर्डनची खचदरी हा आफ्रिकेतील मोठ्या खचदरीचाच एक भाग आहे. तिच्यात समुद्रसपाटीखाली सु. ३९७ मी. असलेला मृत समुद्र असून तो पृथ्वीवरील सर्वांत कमी उंचीचा भाग आहे. यार्मूक, दोन्हीकडील पठारावरून येणारे प्रवाह आणि टायबीरियस सरोवर यांचे पाणी घेऊन संथ, नागमोडी वळणांनी आलेली जॉर्डन नदी मृत समुद्राला उत्तरेकडे मिळते. त्या भागात जमीन इतकी क्षारयुक्त झालेली असते, की तेथे वनस्पती उगवत नाहीत आणि मृत समुद्रात मासे जगत नाहीत. मृत समुद्राच्या दक्षिणेस वाडी अल्‌-अराबा हा अगदी वैराण प्रवाहप्रदेश आहे.

हवामान : जॉर्डनच्या हवेवर समुद्रसपाटीपासूनची उंची, खंडीय वायुराशी आणि भूमध्य समुद्रसान्निध्य यांचा परिणाम झालेला आहे. अम्मान या ७२० मी. उंचीवरील राजधानीच्या शहरी सरासरी मासिक तपमान ७ से. ते ३१ से. असते, तर जेरिको या समुद्रसपाटीखाली १५० मी. असलेल्या शहरी ते १६ से. ते ३२ से. असते. वाऱ्यांची दिशा सामान्यतः पश्चिम व नैर्ऋत्य असते. पाऊस उत्तरेकडे ४० सेंमी. पासून दक्षिणेकडे १० सेंमी. पर्यंत कमी होत जातो तो हिवाळ्यात पडतो. दोन्ही पठारी प्रदेशांत सु. ४० सेंमी. तर जॉर्डनच्या खोऱ्यात तो २० सेंमी. पडतो. मरुप्रदेशात पाऊस जेमतेम ५ सेंमी. पडतो. पठारी भागात क्वचित हिमवर्षाव होतो.

वनस्पती : पठारांवर भूमध्य सामुद्रिक प्रकारची, पूर्व भागात मरुप्रदेशीय व कमी पावसाच्या भागात स्टेप प्रकारची वनस्पती दिसते.

प्राणी : रानडुक्कर, रानबोकड, आयबेक्स, ससा, कोल्हा, रानमांजर, खोकड, तरस, लांडगा, गॅझेली हरिण, मुगूंस, चिचुंद्री, क्वचित चित्ता तसेच सरडे, विंचू, गोमी आणि सोनेरी गरुड, गिधाड, कबुतर, तितर इ. पक्षी आढळतात.

इतिहास : राजकीय दृष्ट्या हल्लीचे जॉर्डनचे राज्य दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आले असले, तरी या प्रदेशात सु. साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून राजकीय घडामोडी व सत्तांतरे होत आली आहेत. इ. स. पू. सोळाव्या शतकापासून इ. स. पू. दहाव्या शतकापर्यंत या भागात अरब, ग्रीक व रोमन सत्ता येऊन गेल्या. इ. स. पू. तेराव्या शतकातच हल्लीच्या जॉर्डनच्या पश्चिम भागात हिब्रू लोकांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यास सुरूवात केली होती. येशू ख्रिस्ताच्या  बाप्तिस्मा जॉर्डन नदीतच झाला होता. इ. स. सातव्या शतकात मुस्लिम अरबांनी हा प्रदेश जिंकून सिरियात  समाविष्ट केला. बाराव्या शतकात काही प्रदेश क्रुसेडर्सच्या ताब्यात होता. सोळाव्या शतकापासून पहिल्या महायुद्धापर्यंत हा भाग तुर्कस्तानात होता. १९१८मध्ये तुर्कांची येथून हकालपट्टी होऊन पॅलेस्टाइनबरोबर हा प्रदेशही ट्रान्स-जॉर्डन नावाने ब्रिटिशांच्या महादेशाखाली आला. हेजॅल येथील इब्‍न हुसेनचा पुत्र अब्दुल्ला ह्याची ब्रिटिशांनी ट्रान्स-जॉर्डनचा अमीर म्हणून १९२२ मध्ये नेमणूक केली. १९२३ पासून प्रदेशाच्या स्वायत्ततेविषयी प्रश्न उपस्थित होऊन अखेर १९४८ मध्ये अब्दुल्ला जॉर्डनचा राजा झाला. त्याने तोपर्यंत राज्याची ब्रिटिशांच्या मदतीने सर्वांगीण प्रगती घडवून आणली होती. पीक आणि ग्‍लब या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताखाली ‘अरब लीजन’ नावाचे छोटे परंतु कार्यक्षम सैन्य उभारले होते. मात्र ब्रिटिश सैन्य देशात ठेवण्यास व आर्थिक आणि परदेशी व्यवहारांत ब्रिटिशांचा सल्ला मानण्यात अनुमती दिली होती. दुसऱ्या महायुद्धात अरब लीजनने मोठी कामगिरी बजावली व १९४४–४५ मध्ये ट्रान्स-जॉर्डन अरब लीगचा स्थापना सदस्य झाला. ब्रिटनने महादेश संपवून ट्रान्स-जॉर्डनचे सार्वभौमत्व मान्य केले. १८४६ मध्ये अब्‍दुल्लाने ‘राजा’ पदवी धारण केली. ब्रिटनची मदत व सवलती चालूच होत्या. मे १९४८ मध्ये इझ्राएलची स्थापना झाली व अरब राष्ट्रे पॅलेस्टाइनच्या प्रदेशात शिरली. ट्रान्स-जॉर्डन नदीच्या पश्चिमेचा पठारी प्रदेश आणि जेरूसलेमचा जुना भाग व्यापला. सु. ५ लाख पॅलेस्टाईन अरब ट्रान्स-जॉर्डनमध्ये पळून आले. युद्धविरामानंतर ट्रान्स-जॉर्डनने व्यापलेला ५,८७९ चौ. किमी. प्रदेश त्याच्याकडेच राहिला. २६ एप्रिल १९४९ रोजी ट्रान्स-जॉर्डनचे नामांतर ‘हॅशेमाइट किंग्डम ऑफ जॉर्डन’ असे करण्यात आले. १९५० मध्ये व्याप्त प्रदेश राज्याला जोडला गेला. संयुक्त राष्ट्राचे तह घडवून आणण्याचे प्रयत्‍न फोल ठरून जॉर्डन-इझ्राएल सीमा बंद झाली. व्यापारबंदी झाली व सीमेवरील चकमकी व कटकटी सतत चालू राहिल्या. जुलै १९५० मध्ये जेरूसलेममध्ये अब्दुल्लाची हत्या झाली. त्याचा थोरला मुलगा तलाल याने ऑगस्ट १९५२ पर्यंत राज्य केले. मनोरोगामुळे त्याला राज्यत्याग करावा लागला. त्याचा थोरला मुलगा हुसेन १९५३ मध्ये राज्यावर आला. जॉर्डनमध्ये ब्रिटिश व अमेरिकन प्रभावांविरुद्ध लोकमत प्रबळ होत होते. १९५६ मध्ये अरब लीजनच्या ले. ज. ग्‍लबला काढून टाकण्यात आले. जुलै १९५७ मध्ये १९४८ चा अँग्‍लो-जॉर्डन तह समाप्त करून शेवटचा ब्रिटिश सैनिक जॉर्डनमधून परत गेला. फेब्रुवारी १९५८ मध्ये जॉर्डनने इराकसह संघराज्य स्थापिले परंतु ६ महिन्यांतच इराकच्या राजाच्या पदच्युतीमुळे ते संपले. अरब प्रजासत्ताकांच्या कटाच्या संशयाने हुसेनने ब्रिटिशांचे साहाय्य घेतले व जॉर्डनची अरब राष्ट्रांबद्दलची तेढ पुढे चालूच राहिली. १९६७ च्या अरब-इझ्राएली युद्धामुळे हुसेनला ईजिप्तचा अध्यक्ष नासर याच्याशी बोलणे करणे भाग पडले परंतु इझ्राएलने त्याच्या व्याप्त प्रदेशातून जॉर्डनच्या सैन्याची हकालपट्टी केली व पूर्वेकडील अविकसित भागात अरब निर्वासितांचा मोठा लोंढा आला. ब्रिटन, अमेरिका व नंतर अरब राष्ट्रे यांनी मदत करूनही जॉर्डनच्या समस्या सुटलेल्या नाहीत. जॉर्डन १९५५ पासून संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असून त्याच्या अनेक समित्या, उपसमित्या व मंडळे यांवर काम करीत आहे.


राज्यव्यवस्था : १९५२ च्या संविधानाप्रमाणे देशाचे शासन राजा, विधिमंडळ व मंत्रिमंडळ यांच्या हाती आहे. जॉर्डनच्या राजाला जॉर्डनमध्ये फार व्यापक अधिकार आहेत. तो मंत्रिमंडळाची आणि सेनेटच्या सभासदांची व अध्यक्षाची चार वर्षांसाठी नेमणूक करतो. राजाचे नातेवाईक नसलेले, ४० किंवा त्याहून अधिक वयाचे, आजी किंवा माजी मुख्यप्रधान, मंत्री, माजी राजदूत, प्रतिनिधी मंडळाचे माजी अध्यक्ष, निदान ‘जनरल’ हुद्याचे निवृत्त सेनाधिकारी इ. विशिष्ट लोक या नेमणुकीला पात्र असतात. यांची संख्या ३० असते. विधिमंडळाचे दुसरे गृह चेंबर ऑफ डेप्युटीज किंवा प्रतिनिधिगृह. याचे एकूण ६० सदस्य निम्मे पूर्व तीर प्रदेशाचे व निम्मे पश्चिम तीर प्रदेशाचे, निदान ३० वर्षे वयाचे, शुद्ध वर्तनाचे, व्यापारी संबंध नसलेले, चार वर्षांसाठी गुप्त मतदानाने निवडले जातात. प्रतिनिधिगृह आपला अध्यक्ष निवडते. ते मंत्र्यांची आणि आपल्या सदस्यांची चौकशी करू शकते. प्रतिनिधिगृहाने मान्य केलेला प्रस्ताव सेनेटकडे व तेथे मान्यता मिळाल्यास राजाकडे जातो व त्याने तो मान्य केला तरच तो ‘विधि’ म्हणून अंमलात येऊ शकतो. राजा विधिमंडळ बरखास्त करू शकतो  व त्याची मुदत वाढवूही शकतो. सध्याच्या प्रतिनिधिगृहाची निवडणूक १६ एप्रिल १९६७ रोजी झालेली आहे. तो तिन्ही सेनादलांचा प्रमुख असतो. युद्ध पुकारणे, ते थांबविणे, तह करणे इ. गोष्टी तो करतो. तहाला विधिमंडळाची मान्यता मिळावी लागते. राजाने देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली असते. राजाची आज्ञा ‘इरादा’ म्हणून निघते. त्यावर संबंधित खाते मंत्र्याची, मुख्य मंत्र्याची व सर्वांचे वर राजाची स्वाक्षरी असते.

शासनासाठी जॉर्डनचे आठ विभाग पाडले आहेत. त्यास ‘लिवा’ म्हणतात. आजलून, अल् बल्‌का, अल् केराक, माआन, नॅब्‌लस, जेरूसलेम (राज्यपाल प्रांत), हीब्रन आणि अम्मान (राज्यपाल प्रांत), यांपैकी नॅब्‌लस, जेरूसलेम आणि हीब्रन हे विभाग जून १९६७ च्या षड्‌दिन युद्धानंतर इझ्राएलने व्यापले आहेत. लिवांचे उपविभाग ‘अक्वादिया’, त्याचे उपविभाग ‘नवाही’ असून त्याचा कारभार शासकीय मंडळे करतात. शहरांत नगरपालिका आणि खेड्यांत पाटील दर्जाचे अधिकारी कारभार पाहतात.

न्याय : जॉर्डनमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ, अपील, धार्मिक, भटक्या जमातींसाठी व खास अशी विविध प्रकारची न्यायालये आहेत. त्या सर्वांवर अंतिम अधिकार राजाचा असतो.

संरक्षण : भूदलाचे दोन चिलखती, एक यंत्रसज्‍ज व दोन पायदळ विभाग आहेत. शिवाय एक स्वतंत्र चिलखती गाडी पथकासह पायदळ विभाग आहे. सप्‍टेंबर १९७३ मध्ये एकूण सैन्य ६८,००० होते. नौदलाच्या आठ सशस्त्र मोटारबोटी अकाबा येथे आहेत. २,००० अधिकारी व सैनिक यांचे विमानदल असून त्यात विविध प्रकारची लढाऊ विमाने आहेत.

आर्थिक स्थिती : शेती, पशुपालन, खाणकाम, उद्योगधंदे आणि पर्यटन हे जॉर्डनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधार असले, तरी त्या सर्वांत शेती व पशुपालन यांसच विशेष महत्त्व आहे.

शेती व पशुपालन : देशातील ८०% हून अधिक लोक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. १०,६९५ चौ. किमी. जमीन कृषियोग्य असून ७५,००० चौ. किमी. कुरणे आहेत. १,२५० चौ. किमी. वनाच्छादित आहे. शेळ्या, मेंढ्या, उंट व गुरे यांचे कळप घेऊन सतत भटकत फिरणाऱ्या लोकांची संख्या ४०,००० पर्यंत आहे. हे लोक मुख्यतः पूर्वेकडील रुक्ष भागात राहतात. यांपेक्षा कितीतरी जास्त लोक अंशतः शेतकरी व अंशतः भटके आहेत. ते पेरण्या झाल्यावर हिवाळ्यात आपापले कळप घेऊन चारापाण्याच्या शोधार्थ भटकत फिरतात, तंबूंत राहतात व उन्हाळ्याच्या सुरुवातीस किंवा सुगीच्या वेळी परत येतात. फक्त शेतीवरच जगणारे लोक जास्त पावसाच्या व सामान्यतः वायव्येकडील प्रदेशात राहतात. त्यांनाही पाणीपुरवठा योजनांची आवश्यकता असतेच. एकूण सु. ६,०७० चौ. किमी. लागवडीखालील जमिनीपैकी सु. १२·८% जमीन ओलिताखाली आहे. प्रमुख पिके गहू व बार्ली ही असून मका, भरड धान्ये, तीळ, घेवडे, तंबाखू, चारा, द्राक्षे, अंजीर, ऑलिव्ह, सफरचंद, पेअर, जर्दाळू, प्लम, पीच, खजूर आणि बदाम वगैरे कवची फळे यांचेही उत्पादन होते. जॉर्डनच्या खोऱ्यात केळी आणि लिंबूजातीची फळे होतात. शिवाय टोमॅटो, कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, बटाटे, कलिंगडे, काकड्या इत्यादींचे उत्पादनही देशात होते. १९७२ साली जॉर्डनमध्ये ७,२३,००० मेंढ्या ४,०५,००० शेळ्या ४५,९६० गुरे १६,१०० उंट व १९७१ मध्ये घोडे, गाढवे इ. मिळून ९०,००० होते. यार्मूक नदीत व अकाबाच्या आखातात मासे मिळतात. जंगलांत अनेक जातींचे ओक, पाइन, ज्यूनिपर, रान ऑलिव्ह, पिस्ता इत्यादींचे उत्पन्न मिळते. फळबागांमुळे कुरणे कमी होऊ लागली तेव्हा कारंजी विहिर काढून चराऊ क्षेत्र  वाढविण्यात आले आहे.

खनिजे : जॉर्डनमध्ये फॉस्फेट, लोहधातुक, फॉस्फरस, मँगॅनीज, तांबे, चिनी माती, जिप्सम, संगमरवर ही खनिजे कमीजास्त प्रमाणात सापडतात. बॅराइट, क्वार्टझाइट, फेल्डस्पार ही अलीकडे सापडली आहेत. दक्षिण भागात तेलाचा शोध चालू आहे. मृत समुद्रापासून मॅग्‍नेशियम फ्लोराइड, मीठ, पोटॅश, ब्रोमीन इ. मिळतात परंतु भांडवलाचा अभाव व इझ्राएलशी कटकटी यांमुळे त्यांचा पुरेपूर लाभ उठविता येत नाही. मुख्यतः तेल हेच प्रमुख शक्तिसाधन आहे. अम्मान आणि एझ-झार्का येथील मोठ्या विद्युत्‌गृहांशिवाय देशात सु. ३० छोटी विद्युत्‌गृहे आहेत. १९७१ मध्ये विजेचे उत्पादन २,१०१ लक्ष किवॉ. ता. झाले.

उद्योगधंदे : देशात सु. १,००० लहानमोठे कारखाने आहेत. त्यांत सिमेंट, पीठ, ऑलिव्ह तेल, सिगारेटी, आगपेट्या, मद्ये, साबण, पादत्राणे, कापडचोपड, फर्निचर, डबाबंद भाज्या इत्यादींचे उत्पादन होते. देशात कामगार संघटनांना मान्यता आहे.

अर्थव्यवस्था : जॉर्डनियन दीनार हे जॉर्डनचे अधिकृत चलन असून एक जॉ. दीनाराचे १,००० फिल् असतात. एप्रिल १९७४ च्या विनिमय दराप्रमाणे १ पौंड स्टर्लिंग = ७५८·९७ फिल् व १ अमे. डॉलर = ३२१·४३ फिल् असा दर होता किंवा १०० जॉ. दी. = १३१·७६ पौंड स्टर्लिंग = ३११·११ अमे. डॉलर्स होते. १, ५, १०, २०, २५, ५०, १०० व २५० फिल्‌ची नाणी व ५०० फिल् आणि १, ५, व १० दीनार यांच्या नोटा असतात.

जॉर्डनला आय-व्ययांची तोंडमिळवणी करणे बरेच जड जाते. ब्रिटन, अमेरिका व अरब राष्ट्रे यांची मदत पुरी पडत नाही. निर्यातीच्या मानाने आयात फार मोठी आहे. त्यांतील फरक कमी करणे, लोकांचे जीवनमान सुधारणे, देशाचा सर्वांगीण विकास करणे इ. उद्दिष्टे साध्य होणे कठीण जाते. याचे एक कारण निर्वासितांची प्रचंड संख्या हे होय. १९७४ च्या अर्थसंकल्पात आय १,५३१ लक्ष जॉ. दी. आणि व्यय १,६५७ लक्ष जॉ. दी. दाखविला होता. १९६४–७१ च्या सप्तवार्षिक योजनेत आर्थिक परावलंबन कमी करण्याचा प्रयत्‍न होता परंतु १९६७ च्या अरब-इझ्राएल षड्‌दिन युद्धामुळे त्यातील बरेच संकल्प अपुरे ठेवावे लागले. इझ्राएलव्याप्त प्रदेशात जॉर्डनचे सु. निम्मे लोक व लागवडीखालील सुपीक जमिनीचा २५% भाग होता. बराचसा औद्योगिक विभागही त्याच प्रदेशात आहे. नंतर १९७३–७५ ची एक त्रैवार्षिक योजना करण्यात आली.


व्यापार : १९७२ साली जॉर्डनमध्ये ९,५३,१०,००० जॉ. दी. किंमतीची आयात झाली व जॉर्डनमधून १,७०,०५,००० जॉ. दी. किंमतीची निर्यात झाली. आयातीत प्राणी व प्राणिज पदार्थ, धान्ये, भाजीपाला, फळे, मसाले, अन्नपदार्थ, कापड व कपडे, रबर, लाकूड, कागद व त्याचे पदार्थ, रसायने, शुद्ध खनिज तेल, खनिजे, यंत्रे, वाहतूक, शेती, वनविकास, छापखाने व प्रकाशन इत्यादींसाठी लागणाऱ्या वस्तू व अवजारे यांचा समावेश होता, तर निर्यातीत फॉस्फेट, टोमॅटो, कलिंगडे, भाजीपाला, सिगारेटी, केळी, इतर फळे, कच्ची कातडी, विजेचे संचायक, ऑलिव्ह तेल इत्यादींचा समावेश होता. जॉर्डनकडे निर्यात करणारे देश अमेरिका १७·६%, ब्रिटन ८·७%, प.जर्मनी ८·७%,   लेबानन ५·४%, जपान ४·८%, सिरिया ४·४%, सौदी अरेबिया ३·६%, इटली, चीन, फ्रान्स, रशिया, नेदर्लंड्‌स, ईजिप्त, भारत व रूमानिया हे देश होते, तर जॉर्डनकडून आयात करणारे देश कुवेत, इराक, लेबानन, सौदी अरेबिया, भारत, यूगोस्लाव्हिया, तुर्कस्तान, चीन, व चेकोस्लोव्हाकिया हे होते.

जॉर्डनमध्ये जॉर्डनच्या मध्यवर्ती बँकेशिवाय सहा राष्ट्रीय बँका व तीन परदेशी बँका असून जॉर्डनच्या दोन विमा कंपन्यांखेरीज परदेशी विमा कंपन्यांच्या शाखा किंवा एजंट आहेत. जकात, अबकारी कर व आय कर यांत वाढ करून उत्पन्न वाढविण्यात येत आहे.

वाहतूक व दळणवळण : हेजॅझ-जॉर्डन रेल्वे हा दमास्कस-मदीना रेल्वेचा नासीब ते नाकब ॲश्तार भाग जॉर्डनमधून झार्का, अम्मान, अल् कात्रान व माआन यांवरून ३६६ किमी. जातो. त्याचा माआन ते मदीना हा भाग चालू नाही आणि तो  दुरूस्त करण्याची योजनाही मागे पडली आहे. त्याचा ११५ किमी. चा माआन-अकाबा फाटा मात्र तयार होत असून तो  फॉस्फेटच्या वाहतुकीस उपयोगी पडेल.

जॉर्डनमध्ये सडकाच वाहतुकीला जास्त उपयोगी आहेत. १९७३ अखेर देशात १,७५१ किमी. मुख्य रस्ते १,५४८ किमी. दुय्यम रस्ते व २,५८२ किमी. इतर रस्ते होते. ८३% रस्ते खडीचे, पक्के आहेत. १९७२ मध्ये १८,७०० खाजगी गाड्या व टॅक्सी ५,७०० मालमोटारी व ४०० मोटारसायकली होत्या.

अकाबा येथे आगबोटींसाठी धक्के, माल साठविण्यासाठी बंदिस्त व उघडी जागा आणि फॉस्फेट निर्यातीसाठी खास धक्का आहे. सौदी अरेबियातील दारान ते लेबाननमधील सायडन हा ट्रान्स-अरेबियन तेलनळ सु. १७५ किमी. जॉर्डनमधून जातो आणि जॉर्डनला त्याबद्दल वर्षास १५ लक्ष पौंड मिळतात. शत्रूंच्या कारवायांमुळे तो वारंवार तोडला जातो. दुसरा इराक-हैफा तेलनळ अरब इझ्राएल युद्धापासून बंद आहे.

अम्मान व अकाबा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. अलाइया ही जॉर्डनची विमान वाहतूक कंपनी आहे. १९७१ मध्ये १९,१५० दूरध्वनी १९६९ मध्ये १,५०,००० रेडिओ संच आणि ८५,००० दूरचित्रवाणी संच होते. १९५९ मध्ये सुरू झालेल्या रेडिओ प्रक्षेपण केंद्रातून व १९६८ मधील दूरचित्रवाणी केंद्रातून अरबी आणि इंग्रजी भाषांतून कार्यक्रम प्रसारित होतात. १९७२ मध्ये ३२ चित्रपटगृहे होती.

जॉर्डनमध्ये ४ दैनिके व ७ साप्ताहिके प्रसिद्ध होतात. ती बहुतेक सर्व अम्मानमध्ये आहे.

लोक व समाजजीवन : पूर्वेकडे मरुप्रदेशात भटकणाऱ्या लोकांत बेदूई बेनी सख्र, अल्‌ हुवाईतात यांच्या टोळ्या प्रमुख आहेत. त्यांशिवाय इतर लहानसहान टोळ्या आहेतच. जॉर्डनमध्ये आर्मेनियन, नेस्टोरियन, समॅरिटन,  ड्रूझ व बहाई तुर्कमेन, सिर्कासियन हे अल्पसंख्यांक गट आहेत. सु. ९०% लोक सुन्नी मुस्लिम असून काही थोडे शिया पंथी व खिस्ती आहेत. पूर्व तीर (ईस्ट बँक) प्रदेशात सु. ४०० व पश्चिम तीर (वेस्ट बँक) प्रदेशात सु. ८०० खेडी आहेत. सु. ५३% लोक ग्रामीण आहेत. सामान्यतः प्रत्येक गावात प्राथमिक शाळा, मशीद व जवळच चराऊ कुरण असते. मोठ्या गावात दवाखाना व टपाल कचेरी असते. साक्षरताप्रसार व आधुनिक संपर्कसाधने यांमुळे लोकजीवन बदलत आहे. शहरांतून रुग्णालये, बँका, शाळा, प्रार्थनामंदिरे, ग्रंथालये, करमणुकीची साधने दिसतात. उच्च शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांचीही सोय आढळते. देशाची भाषा अरबी आहे.

शिक्षण : जॉर्डनमध्ये सामान्य शिक्षण निःशुल्क असेल, तरी त्याच्या सोयी पुरेशा नाहीत. १९७२–७३ मध्ये पूर्व तीर प्रदेशात १,४८२ शासकीय २१३ खाजगी आणि संयुक्त राष्ट्रांच्या मदतीच्या १७१ शाळांतून ४,६३,२३६ विद्यार्थी होते. त्यांपैकी १,९८,३७९ मुली होत्या. १४,४१८ शिक्षक होते. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या जॉर्डन विद्यापीठात १४५ शिक्षक व ३,५८९ विद्यार्थ्यांपैकी १,०८८ मुली होत्या. ७ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत १,५६७ पुरुष आणि ६७६ स्त्री विद्यार्थी होते. ३ शेतकी शाळांतून २८ शिक्षक व ३६६ विद्यार्थी ५ औद्योगिक शाळांतून १४० शिक्षक व १,१७७ विद्यार्थी ३ परिचारिका, दाई व शिशुपालन शाळांतून २० शिक्षक व २०६ विद्यार्थी होते. एका समाजसेवा शिक्षणसंस्थेत ६ शिक्षक व ६१ विद्यार्थी होते.


आरोग्य : १९७२ मध्ये १,००० डॉक्टर ११२ दंतवैद्य, २९ रुग्णालये व त्यांत ३,८६४ खाटांची सोय होती.

सुमारे ६३,००० जॉर्डन नागरिक देशाबाहेर आहेत परंतु देशातील सु. ७,००,००० निर्वासितांचा प्रश्न हाच सर्वांत बिकट होऊन बसला आहे. १९६७ च्या युद्धापूर्वीच्या निर्वासितांची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांनी आणि त्यानंतरच्या निर्वासितांची जबाबदारी जॉर्डन शासनाने उचलली आहे. अरब राष्ट्रांची त्यांसाठी मदत मिळते.

अम्मान (लोकसंख्या ५,८३,०००) शिवाय झार्का (२,००,०००) व इर्बिद (१,१०,०००) ही प्रमुख मोठी शहरे आहेत. अल् केराक, अल् मॅफ्राक, मुडॅरार, माआन, अकाबा इ. इतर शहरे आहेत परंतु जेरूसलेम, बेथलीएम, जेरिको, नॅब्‍लस, हीब्रन, राम्मुन इ. महत्त्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पश्चिम तीर (वेस्ट बँक) विभागात आहेत. तीच पर्यटकांची मुख्य आकर्षणे आहेत.

पर्यटन : पर्यटन हा जॉर्डनच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा व वाढता आधार होता परंतु पश्चिम तीर विभाग इझ्राएलने व्यापल्यामुळे त्याची फारच हानी झाली आहे. १९७२ मध्ये २,३२,३०० परदेशी पर्यटक जॉर्डनमध्ये आले होते. त्यांच्याकडून परकी चलन मिळते.

अडचणींतून मार्ग काढून विकास साधण्याचा प्रयत्‍न जॉर्डन करीत आहे.

कुमठेकर, ज. ब.

जॉर्डनचे राष्ट्रीय सभागृह.
जॉर्डन नदीतीरावरील वैशिष्ट्यपूर्ण घरे, जेरिको.
तेल-शुद्धीकरण कारखान्याचे दृश्य, अम्मान, जॉर्डन.
खडकात शिल्पिलेला प्राचीन थडग्यांचा दर्शनी भाग, पेत्रा, जॉर्डन.
जॉर्डनमधील सोपान शेती