नैमिषारण्य : एक प्राचीन अरण्य. याचा निर्देश काठक संहिता, तांड्य महाब्राह्मण, कौषीतकीजैमिनीय ही ब्राह्मणे, छांदोग्य उपनिषद, रामायण, महाभारत, पुराणे इ. ग्रंथांत आला आहे. हे उत्तर प्रदेशातील गोमती नदीच्या डाव्या तीरावरील सीतापूरपासून बत्तीस किमी. वर असून याचे आधुनिक नाव निमखारवण किंवा नैमिषारण्य, निमसार आहे. निमसार स्थानक अयोध्या–रोहिल खंड लोहमार्गावर व लखनौच्या वायव्येस ७२ किमी. आहे. सोमवती अमावास्येस येथे मोठी यात्रा भरते. याच अरण्यात सौतीने शौनकादी ऋषींना महाभारत सांगितले, शौनकाने येथे एक दीर्घकालीन सत्र चालविले असता, सौतीचा पिता लोमहर्षण याच्या उर्मटपणाबद्दल बलरामाने त्याचा वध केला. अशा प्रकारच्या कथा या स्थानाविषयी रूढ आहेत.

खरे, ग. ह.