टोपीका : अमेरिकेच्या कॅनझस राज्याची राजधानी. लोकसंख्या १,२५,०११ महानगरी १,५५,३२२ (१९७०). हे शेतीसमृद्ध प्रदेशात कॅनझस नदीच्या तीरावर वसले आहे. धान्य दळणे, मांस, अंडी, अन्नपदार्थ वगैरेंचे संवेष्टन, दुग्धशाला, रेल्वे कर्मशाळा, छपाई, प्रकाशन वगैरे व्यवसाय येथे चालतात. रबरी वस्तू, तंबू व तंबूचे दोर, औषधे, कपडे इ. कारखाने येथे आहेत. येथे शासकीय मनोरुग्णालय, मनोरोग प्रशिक्षण संस्था, निग्रो तांत्रिक विद्यालय, व्यापारी महाविद्यालये, वॉशबर्न विद्यापीठ, कॅनझस इतिहास मंडळाचे ग्रंथालय व संग्रहालय, मल्व्हेन कला-संग्रहालय, उद्याने वगैरे शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आहेत. १९५१ च्या पुरामुळे शहराचे बरेच नुकसान झाले.

लिमये, दि. ह.