गँबिया नदी: पश्चिम आफ्रिकेतील गँबिया देशाचा एकमेव व्यापारी जलमार्ग. लांबी १,१०० किमी. गिनी देशातील फूटा जालन पर्वतप्रदेशात लाबेजवळ समुद्रापासून अवघ्या २४० किमी. वर उगम पावून प्रथम ईशान्येस, मग वायव्येस आणि नेरिको व ग्रे या उपनद्या मिळाल्यावर पश्चिमेकडे वळून ती कोईनाजवळ गँबियात शिरते. बॅराकुंडा द्रुतवाहांवरून खाली येऊन ती बासे, जॉर्जटाउन, कूंता-ऊर, काउ-ऊर इ. गावांवरून एलेफंट बेटाजवळ येते. तेथून तिची १५० किमी. लांबीची खाडी सुरू होते. तेथे ती १·६ किमी. रुंद आहे. मुखाजवळील सेंट मेरी बेटावरील गँबियाची राजधानी व प्रमुख बंदर बॅथर्स्ट (हल्लीचे बँजुल) येथे ती ५ किमी. रुंद आहे. जून ते नोव्हेंबर पूर येतात, तेव्हा नदीच्या काठी दलदली होतात. खाडीच्या दोन्ही बाजूंस उंच, सलग खारकच्छ वनस्पती आहेत. वरच्या बाजूस प्रवाहांच्या कडेने अरण्ये व काही ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत, त्यांवर गुरे पाळतात. गँबियाची मुख्य निर्यात भुईमुगाची. त्याशिवाय पामतेल, पामगर, मेण, कातडी, चामडी यांचीही निर्यात होते. त्यासाठी सागरगामी नौका मुखापासून आत २४० किमी.  वरील कूंता-ऊरपर्यंत नियमित ये-जा करतात. कधीकधी त्या जॉर्जटाउनपर्यंतही जातात. नदीनौका बासे व कोईनापर्यंत जातात. नदीतून जाताना सुसरी, हिप्पो, बॅबून व इतर जंगली प्राणी दिसतात. नदीच्या दक्षिणेकडून मोठी सडक झाल्यापासून प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने तिचे महत्त्व कमी झाले आहे. गँबिया नदीचा शोध पोर्तुगीजांनी लावला. टॉलेमी व अरब भूगोलज्ञ यांस ती माहीत होती. १४५५ मध्ये अलव्हायझे का द मॉस्टॉ याने तिचा थोडा भाग शोधला होता. १७५५ व १८०५ मध्ये मंगो पार्क या नदीमार्गाने गेला. १८१८ मध्ये गास्पार मॉल्यँ याने तिचा उगम संशोधिला.

कुमठेकर, ज. ब.