कोरल समुद्र : पॅसिफिकच्या नैर्ऋत्य भागातील समुद्र. याच्या पश्चिमेस ऑस्ट्रेलियाचे क्वीन्सलँड राज्य, उत्तरेस पापुआ व सॉलोमन बेटे, पूर्वेस न्यू हेब्रिडीझ व न्यू कॅलेडोनिआ बेटे व दक्षिणेस चेस्टरफील्ड प्रवाळबेटे आहेत. यातील प्रवाळभित्तींमुळे याला ‘कोरल’ नाव मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याजवळची ग्रेट बॅरिअर रीफ त्यांत प्रमुख आहे. प्रवाळभित्तींमुळे या समुद्रातून नौकानयन धोक्याचे झाले आहे. हा समुद्र काही ठिकाणी ४,५७५ मी. खोल आहे. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत येथे जोरदार वादळे होतात. मे १९४२ मध्ये या समुद्रात जपानी व अमेरिकी आरमारांची हवाई लढाई होऊन उभयपक्षी बरेच नुकसान झाले.

कुमठेकर, ज. ब.