भारतीय बाजारपेठ, दरबान.

दरबान : दक्षिण आफ्रिकेतील नाताळ प्रांताची राजधानी व हिंदी महासागरावरील एक महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ७,२९,८५७ (१९७०). नाताळ प्रांतातील सर्वांत मोठे व दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. उमगेनी आणि उमलास या दोन नद्यांच्या जलोढीय भागात हे शहर वसले आहे. १८२४ साली या शहराची स्थापना झाली आणि पहिला गव्हर्नर सर बेंजामिन दरबान यावरून या शहराला हे नाव पडले. येथील एकंदर हवामान समशितोष्ण असून वार्षिक कमाल व किमान तपमानांत फारसा फरक असत नाही, वार्षिक पर्जन्यमान सरासरी ११० सेंमी, असून, बहुतेक पाऊस ऑक्टोबर ते मार्च ह्या उन्हाळ्याच्या महिन्यांत पडतो.

दरबान हे उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून सर्व दक्षिण गोलार्धात प्रसिद्ध असून इंधन, जहाज दुरूस्ती इत्यादींसारख्या उत्तमोत्तम सोयी येथे उपलब्ध आहेत. बंदरातून मुख्यतः साखर, कोळसा, लोकर, हाडे, खनिजे इत्यादींची निर्यात व खनिज तेल, लाकूड, धान्य इत्यादींची आयात केली जाते. नाताळ विद्यापीठ येथे असून सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. ह्या शहराच्या आसमंतात उत्तमोत्तम बागा व लहानमोठे मळे असल्यामुळे द. आफ्रिकेतील लोक याला ‘बागांचे शहर’ असे म्हणतात. हे एक महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र असून येथे कागद, कापड, साखर, साबण, रबर, रासायनिक खते, रंग, रसायने, प्लॅस्टिक, काच, धातुसामान, लाकडी वस्तू, दारू गाळणे इ. असंख्य लहानमोठे कारखाने असून देवमासे पकडण्याचा धंदाही मोठा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सर्व भागांशी दरबान हे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गांनी जोडले आहे. दरबानच्या दक्षिणेस १३ किमी. वर रियून्यन येथे लुईबोथा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

लिमये, दि. ह. चौधरी, वसंत