व्ह्‌लॅदिमिर : रशियाच्या पश्चिम भागातील एक शहर व याच नावाच्या ओब्लास्टचे प्रशासकीय केंद्र. लोकसंख्या ३,५०,००० (१९८९ अंदाज). मॉस्कोपासून पूर्वेस १७६ किमी. अंतरावर, ओका नदीच्या क्लीअँइमा या उपनदीच्या काठावरील एका टेकडीवर हे शहर वसले आहे. कीव्हचा राजा व्हलॅदिमिर दुसरा मनमॅख याने इ.स.११०८ मध्ये याची स्थापना केली. क्लीअँइमा नदीतून चालणाऱ्या व्यापारामुळे शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पुढे हे कीव्हची राजधानी बनले. (११५७). तातारांनी दोनदा शहरांची लूट व जाळपोळ केली. (१२३८ – ९३). पुढे पंधराव्या शतकातही अशी लूट व जाळपोळ होत राहिली. इ.स. १३०० मध्ये येथे ऑर्थाडॉक्स चर्च स्थापन झाले. पंधराव्या शतकातच व्हलॅदिमिर मॉस्कोच्या सत्तेखाली आले. १७९६ मध्ये प्रांतीय शासनाचे हे प्रमुख ठिकाण बनले. रशियन क्रांतीनंतरच्या काळात प्रामुख्याने वस्त्रोद्योग, यंत्रनिर्मिती, ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्राचे सुटे भाग, प्लॅस्टिक व रसायन उद्योगाच्या आधारवर व्हलॅदिमिरची वाढ झाली.

शहरात इतिहासकालीन रशियन वास्तुशिल्पांचे काही उत्कृष्ट नमुने पाहावयास मिळतात. उदा., कॅथीड्रल ऑफ अँझम्प्शन (११५८), कॅथीड्रल ऑफ दि डॉर्मिशन (११५८ –८९), कॅथीड्रल ऑफ सेंट डिमिट्री (११९७ – १८३५), विजयसूचक ‘गोल्डन गेट्स’ (११५८) इत्यादी. शहराच्या पश्चिम बाजूस ‘गोल्डन गेट्स’ असून बाराव्या शतकातील रशियन लष्करी वास्तुशिल्पाचा तो एकमेव अविशिष्ट नमुना आहे. तांब्याच्या तावदानांवर सोन्याचा मुलामा चढवून ही दारे तयार केली आहेत. शहराच्या पूर्वेकडील ‘सिल्व्हर गेट्स’ आता अस्तित्वात नाहीत.

चौधरी, वसंत