प्लिमथ : इंग्लंडच्या डेव्हन परगण्यातील इतिहासप्रसिद्ध शहर व उत्कृष्ट नैसर्गिक बंदर. लोकसंख्या २,५१,२०० (१९७४ अंदाज). हे लंडनच्या नैऋत्येस ३०६ किमी., प्लिमथ साउंडच्या (इंग्लिश खाडीचा चिंचोळा भाग) उत्तर काठावर प्लिम व टेमर या नद्यांदरम्यान वसले आहे. चौदाव्या शतकापासून इंग्लिश खाडीवरील एक महत्त्वाचा नाविकतळ येथे होता. याच बंदरातून १५७७ मध्ये सर फ्रान्सिस ड्रेकने व अठराव्या शतकात कॅ. कुकने आपल्या दर्यावर्दी मोहिमांना सुरूवात केली. प्लिमथ साउंडमधील सेंट निकोलस बेटास ड्रेकचे नाव देण्यात आले.

प्लिमथ, स्टोनहाउस व डेव्हनपोर्ट ही तीनही शहरे मिळून १९१४ नंतर आधुनिक प्लिमथ ओळखले जाऊ लागले. सटन हे त्याचे बंदर असून पूर्वी ते सडटन या नावाने ओळखले जात असल्याचा उल्लेख डूम्झडे बुक (१०८६) या नोंदणी पुस्तकात आढळतो. चौदाव्या शतकात लष्कराकडून फ्रान्सशी जलमार्गाने होणाऱ्या व्यापारामुळे या बंदराचे महत्त्व एकदम वाढले व त्यामुळे १४३९ मध्ये ब्रिटिश संसदेकडून यास स्वायत्त महामंडळाचा दर्जा प्राप्त झाला. असा दर्जा मिळालेले हे पहिले इंग्लिश शहर ठरले. १५८८ मध्ये स्पॅनिश आर्माडावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश आरमार या बंदरातूनच निघाले. ग्रेट ब्रिटनमधून १६२० मध्ये अमेरिकेत वसाहतीसाठी निघालेल्या ’पिलग्रिम फादर्स’ यांचे ’मे प्लॉवर’ हे जहाजही याच बंदरातून निघाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४१ मध्ये बाँब हल्ल्यांनी या शहराचे अतोनात नुकसान झाले व १,१०० लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर १९४५ पासून या शहराच्या पुनरूज्जीवनास सुरूवात झाली.

आधुनिक प्लिमथची रचना योजनाबद्ध असून शहराच्या परिसरात अनेक कारखाने आहेत. येथे कापड, रेडिओसामग्री, वंगण उत्पादने, अन्नप्रक्रिया, रसायने, अभियांत्रिकी, जहाजबांधणी, चिनी मातीची भांडी इ. उद्योगांचा विकास झाला आहे. चिनी मातीची भांडी बनविण्याचा इंग्लंडमधील पहिला कारखाना येथे उभारण्यात आला (१७६८). येथून होणाऱ्या निर्यातीत चिनी माती व आयातीत कोळसा, तेल यांचा मुख्य समावेश असतो. शहरात अनेक नाविक अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

या शहराचा दक्षिणेकडील ’प्लिमथ हो’ म्हणून ओळखला जाणारा समुद्रकिनाऱ्याचा भाग पर्यटकांचे खास आकर्षण आहे. येथे ’मरीन बायॉलॉजिकिल असोसिएशन’चे प्रधान कार्यालय असून एक जलजीवालयही आहे. शहराच्या प्लिमथ हो भागातील सतराव्या शतकातील ’रॉयल सिटडेल’, एडिस्टन दीपगृह, फ्रान्सिस ड्रेकचा पुतळा, सागरी युद्धस्मारक, संग्रहालय व कलावीथी, मध्ययुगीन चर्च इ. उल्लेखनीय वास्तू आहेत.

चौंडे, मा. ल.