अधोणी : आंध्रप्रदेश राजाच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तालुक्याचे शहर. लोकसंख्या ८५,३१४ (१९७१). येथील तपमान २२.५ते १७.५से. व वार्षिक पर्जन्य सरासरी ६० सेंमी. आहे. येथील लोकसंख्येपैकी सु. / मुसलमान आहेत. येथे प्रामुख्याने तेलुगू व कानडी भाषा बोलल्या जातात. तुंगभद्रेच्या दक्षिणेचे हे मोक्याचे ठिकाण असल्यामुळे दक्षिण हिंदूस्थानच्या अनेक लढायांत अधोणी गाजलेले आहे. चौदाव्या शतकात विजयानगरच्या राजाने अधोणीजवळ असलेल्या डोंगरातील पाच टेकड्यांवर एक अभेद्य दुर्ग बांधला. तालिकोटच्या लढाईनंतर तो विजापूरचा आदिलशहा, नंतर औरंगजेब, फ्रेंच सेनानी बुसी, निजामी सरदार बसालतजंग, टिपू सुलतान व अखेर १८०० मध्ये इंग्रज यांना मिळाला. किल्ल्याच्या खडकांत जैनमूर्ती कोरलेल्या आहेत. किल्ल्याच्या पाच टेकड्यांपैकी बारखिला व तालीबंदा या दोन उंच असून बारखिलावर शस्त्रागार व एक दगडी तोफ आहे.

अधोणी दक्षिण रेल्वेच्या रायचूर-गुंटकल मार्गावर, रायचूर व गुंटकलपासून अनुक्रमे ६९ व ५२ किमी. वर आहे. अधोणी कापसाची मोठी बाजारपेठ असून सुती व रेशमी हातमाग कापड व पक्क्या रंगाच्या टिकाऊ सतरंज्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे एक कापूस-अन्वेषणकेंद्र असून अनेक पिंजण-कारखाने, तीन कापड-गिरण्या, एक वनस्पती-तुपाचा कारखाना आणि साबण, बिडी, पाट्या व पेन्सिली इत्यादींचे कारखाने आहेत.

ओक, शा. नि.