मंदसोर : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७७,५५७ (१९८१). रतलाम-अजमेर मध्यममापी लोहमार्गावरील हे स्थानक असून क्षिप्रा नदीच्या सिवना या उपनदीच्या तीरावर हे वसले आहे. येथे अनेक पुरावशेष आढळले असून ऐतिहासिक व पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. याचे प्राचीन नाव ‘दशपूर’ (दहा वाड्यांचे गाव) असून नासिकजवळ सापडलेल्या शिलालेखात याचा उल्लेख आढळतो. पहिल्या कुमारगुप्ताच्या कारकीर्दीत (इ. स. ४३७) येथील सूर्यमंदिर बांधले गेले व पुढे ३६ वर्षांनी त्याची डागडुजी करण्यात आली, असा उल्लेख मंदसोरजवळच्या एका शिलालेखात मिळतो. बहादुरशहाच्या छावणीला हुमायूनने येथेच वेढा टाकून त्याला पळवून लावले (१५३५). अकबराने १५६२ मध्ये मंदसोर घेतले व तेव्हापासून ते राज्याचे मुख्य केंद्र बनले. अठराव्या शतकात ते शिंद्यांच्या आणि त्यानंतर होळकरांच्या ताब्यात आले. साहिबझादा फिरोझशहा याने १८५७ मध्ये यावरील आपले वर्चस्व वाढविले. चौदाव्या शतकात अलाउद्दीन खल्जीने येथे किल्ला बांधला. मंदसोरचा परिसर अफूच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. धान्य, कापूस, अफू, सूत यांचा व्यापार आणि कापूस वटवणी व दाबणी, साखर, हातमाग कापड, अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे या शहरात चालतात. स्त्रियांच्या उत्तम प्रतीच्या चुनड्या तयार करण्यासाठी मंदसोर प्रसिद्ध आहे.

चौधरी, वसंत