गारॉन : फ्रान्सच्या नैर्ऋत्य भागातील महत्त्वाची नदी. लांबी सु. ६४३ किमी. जलवाहन क्षेत्र सु. ७७,७०० चौ. किमी. पिरेनीज पर्वताच्या स्पेनमधील मालाडेटा विभागात उगम पावून गारॉन ४८ किमी. वाहत जाऊन स्पेन-फ्रान्स सीमा ओलांडते व फ्रान्सच्या ऑट गारॉन विभागात शिरते. लानमझँ पठारास वळसा घालून ती ५७० मी. उंचीवरील एका अरुंद घळईतून मैदानात उतरते व ईशान्य दिशेने तुलूझपर्यंत जाते. वाटेत तिला पिरेनीजमधूनच आलेली आर्येझ ही मोठी उपनदी मिळते. त्याशिवाय तिला उजवीकडून टार्न, लॉट, साला आणि डावीकडून नेस्त, साव्हे, झेअर, बाईझ व सीराँ या प्रमुख उपनद्या मिळतात. ॲक्विटेनच्या सखल भागातून खूप मोठे वळण घेऊन तुलूझवरून वायव्येकडे आझँ, मार्मादवरून ती बॉर्दोपर्यंत जाते. तेथून २६ किमी. उत्तरेस बीद अँबेस येथे तिला दॉरदॉन्यू नदी मिळते. तेथून जिराँद खाडी सुरू होते व तेथून ७२ किमी. वर अटलांटिकच्या बिस्के उपसागरास मिळते. वारंवार अचानक पूर येणे हे गारॉनचे वैशिष्ट्य आहे. कास्तेनंतर गारॉनच्या पात्राची रुंदी वाढते व बॉर्दो येथे ते सु. ५५० मी. रुंद होते. अंतर्गत जलमार्ग म्हणून गारॉनचे महत्त्व मोठे आहे. मोठाली जहाजे अटलांटिकमधून बॉर्दो या प्रसिद्ध बंदरात येतात. तेथून ५५ किमी. वरील कास्तेपासून तूलूझपर्यंत १९२ किमी. लांबीचा गारॉन लॅटरल कालवा आहे. तेवढ्या अंतरात १२८ मी. चा चढ आहे तो ५० पाणशिड्यांनी पार करतात. तूलूझपासून भूमध्य समुद्रापर्यंत कानाल द्यू मीडी हा कालवा आहे. या दोन्ही कालव्यांतून अन्नपदार्थ, मद्य, रेशीम, फळे, औद्योगिक सामग्री इत्यादिकांची मोठी वाहतूक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मालाडेटातून बोगदे काढून रस्ते केल्यामुळे, गारॉनचा वरचा प्रवाहमार्ग स्पेनमधून दळणवळणास खुला झाला व हौशी प्रवाशांचे एक आकर्षण ठरला.                                

कुमठेकर, ज. ब.