एसेन : पश्चिम जर्मनी राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ६,९६,४१९ (१९७१). हे नॉर्थ र्‍हाईन-वेस्टफेलिया प्रांतात, रूर नदी व र्‍हाईन-हर्न कालवा ह्यांच्या मध्ये, डॉर्टमुंडच्या पश्चिमेस ४० किमी. आहे. नवव्या शतकात बांधलेल्या बेनेडिक्टीन प्रार्थनामंदिराभोवती शहराची वाढ झाली. या मंदिराचे काही अवशेष व पूजासाहित्य अद्याप जपलेले आहे. गेल्या शतकात एसेनजवळ कोळसा व लोखंड यांचे साठे सापडल्यामुळे एसेनमध्ये प्रचंड उद्योगधंदे निर्माण झाले. त्यामुळे एसेनची जगातील अग्रक्रमाच्या औद्योगिक शहरांत गणना होऊ लागली. येथून जर्मनीस स्वस्त वीज मिळू लागली व जवळच क्रपचा शस्त्रास्त्रांचा अवाढव्य कारखाना आला. याचमुळे दुसऱ्या महायुद्धात एसेन हे दोस्तांच्या बाँबहल्ल्यांचे अग्रलक्ष्य होऊन क्रपचा कारखाना व एसेन भस्मसात झाले. युद्धानंतर शहरातील बरेच मोहल्ले व क्रपचा कारखानाही पुन्हा बांधण्यात आला व आता तेथे मोटारी, एंजिने, कापड, काच, औषधे, फर्निचर, सिमेंट, मद्य इत्यादींचे उत्पादन होते. यूरोपातील अनेक लोहमार्ग या शहरातून जातात.

शहाणे, मो. ज्ञा.