नडियाद : गुजरात राज्याच्या खेडा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण, लोकसंख्या १,०८,२६९ (१९७१). हे खेडा शहराच्या आग्‍नेयीस सु. १९ किमी. असून पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानक आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हे कापूस व नीळ उत्पादन करणारे सर्वांत मोठे शहर होते, तर १७७५ मध्ये गुजरातमधील सुंदर शहरांत याचा समावेश होता. जुन्या शहराभोवती एक खंदक व नऊ वेशी होत्या. दळणवळणाच्या सोयीमुळे येथे कापूस, खाद्यान्न, तंबाखू, तूप, फळे व इमारती लाकूड इत्यादींचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच येथे उद्योगधंद्यांचाही विकास झाला असून त्यांत सुती वस्त्रोद्योग, कातड्याच्या वस्तू तयार करणे, चिनीमातीची भांडी व पितळेची भांडी तयार करणे, दुग्ध पदार्थ तयार करणे इ. उद्योगांचा समावेश होतो. साखर कारखानेही वाढत आहेत, यांमुळे हे खेडा जिल्ह्यातील प्रगत शहर म्हणून ओळखले जाते. येथे १८६६ पासून नगरपालिका आहे. शहरात प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, एक महाविद्यालय, ग्रंथालये, दवाखाने इत्यादींच्या सोयी आहेत.

पाठक, सु. पुं.