मनामा : (अल् मनामा) .बहारीन देशाची राजधानी .लोकसंख्या १,२१,९८६ (१९८१ अंदाज) .हे बहारीन बेटाच्या ईशान्य कोपर्‍यात वसलेले आहे. बहारीनचे प्रमुख औद्योगिक, व्यापारी, प्रशासकीय व सांस्कृतिक केंद्र म्हणून यास विशेष महत्व आहे. मध्य युगीन इस्लामी इतिवृत्तामध्ये मनामाचा निर्देश असून तो इ.स. १३४५ मधील आहे. हे शहर १५२१ मध्ये पोर्तुगीजांच्या आणि पुढे १६०२ मध्ये इराणी राज्यकर्त्याच्या ताब्यात होते. सामान्यपणे १७८३ पासून हे येथील अल खलीफा या राजघराण्याच्या ताब्यात होते. १८६१-१९१४ यांदरम्यान ब्रिटिशांबरोबर केलेल्या अनेककरारांमुळे त्यावरील ब्रिटिश प्रभाव वाढला.येथे १९०१ पासून ब्रिटिशांचा राजकिय प्रतिनिधी होता. १९७१ पासून हे स्वतंत्र बहारीन राज्याची राजधानी बनले.

मासेमारी , जहाजबांधणी, मोती काढणे आणि आयात-निर्यात व्यापार हे येथील पारंपारिक उद्योगधंदे, बहारीनमध्ये १९३२ साली खनिज तेलाचा शोध लागला. त्यामुळे मनामाचा कायापालट होऊन ते अत्याधुनिक शहर बनले. १९५८ मध्ये हे मुक्त बंदर म्हणून घोषित करण्यात आले. शहराच्या ईशान्येस नव्या बंदरसुविधा १९६२ पासून उपलब्ध झाल्यामुळे येथे महासागरी बोटींची ये-जा होऊ लागली. इराणच्या आखातातील एक महत्वाचे बंदर म्हणून हे प्रसिध्द आहे. हे एका सेतुमार्गाने शेजारच्या मुहॅरॅक या बेटाशी जोडलेले आहे.

जाधव, रा.ग.