भारतीय सेना अकादमी, डेहराडून.

डेहराडून : उत्तर प्रदेश राज्याच्या डेहराडून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,०३,४६४ (१९७१). हे दिल्लीच्या ईशान्येस २४० किमी.वर हरद्वार–डेहरा रेल्वे-फाट्याचे शेवटचे स्थानक असून मसुरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स. स. ६७० मी. उंचीवर आहे. हे चहा-प्रक्रिया उद्योगाचे प्रमुख केंद्र असून येथे भारतीय सर्वेक्षण खाते व वन खाते यांची प्रमुख कार्यालये आणि भारतीय सेना अकादमी व राष्ट्रीय आणि भारतीय सैनिक महाविद्यालय या संस्था आहेत. वन महाविद्यालयाच्या सुंदर इमारतीत वन-संशोधन विभाग व वन्य वस्तुसंग्रहालय आहे. येथे पुरातत्त्वविद्याविषयक सर्वेक्षण प्रयोगशाळा, तसेच तीन महाविद्यालये व सहा वस्तुसंग्रहालये आहेत. याच्या ईशान्येस काही अंतरावर एक गंधकयुक्त ऊष्ण पाण्याचे कुंड आहे. शीखांच्या एका पंथाचे गुरू रामराय यांनी १६९९ मध्ये डेहराडूनची स्थापना करून तेथे गुरु-मंदिर बांधले.

सावंत, प्र. रा.