कन्सेप्शन : चिलीतील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,२३,६३० (१९७२). चिलीचा विजेता पेद्रो दे व्हालदीव्ह्या याने हे शहर बीओ व्हीओ नदीच्या मुखापाशी १५५० मध्ये वसविले. प्रारंभकाली या भागातील अरौकानियन इंडियनांनी स्पेनच्या आक्रमणास जो प्रखर विरोध केला, त्याचे तडाखे कन्सेप्शनला वारंवार बसले. १५५५ मध्ये इंडियनांचा नेता लॉतेरो याने हे बेचिराख केले होते. भूकंपाचे धक्के वारंवार बसून अनेकवेळा या शहराचा विध्वंस झाला होता. १९६० व १९७१ मध्येही भूकंपाने बरीच पडझड झाली होती. वारंवार पुनर्रचनेचा फायदा म्हणूनच की काय कन्सेप्शन हे आधुनिक आखणी, बांधणी व सौंदर्य यांबद्दल प्रसिद्ध आहे. देशातील हे तिसर्‍या क्रमांकाचे शहर असून व्यापार, उद्योग, शिक्षण वदळणवळण यांचे केंद्र आहे. येथून मद्ये, धान्य, कातडी, कापड व इतर माल निर्यात होतो. येथे उत्कृष्ट प्राणी-संग्रहोद्यान व विद्यापीठ आहे. चिलीतील ९० टक्के कोळसा शहराजवळील कोळशाच्या खाणींतून निघतो. शहरात पीठ, भात, कापड, आसवन्या, साखर, काचसामान यांचे उद्योग आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.