ॲस्ट्राखान: रशियातील ॲस्ट्राखान प्रांताची राजधानी व कॅस्पियन समुद्रावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,११,००० (१९७०). हे व्होल्गा नदीच्या दक्षिण तीरावर, तिच्या त्रिभुजप्रदेशाच्या शिरोभागी, मुखापासून ८८किमी. आत समुद्रसपाटीखाली सु. १५ मी. आहे.
तार्तरांची ही एके काळची राजधानी १५५६ मध्ये रशियाने जिंकली. दुष्काळ, रोगराई, आग, पूर यांचे अनेक तडाखे बसूनही पृष्ठभागी व्होल्गाचा समृद्ध प्रदेश, मोक्याचे स्थान व कॅस्पियन समुद्रातील मत्स्यसंपत्ती यांमुळे ॲस्ट्राखानची झपाट्याने वाढ झाली. रशियातील मत्स्योद्योगाचे हे एक प्रमुख केंद्र आहे. याशिवाय येथे जहाजबांधणी, लाकूड, अन्नपदार्थ, मद्योत्पादन इत्यादींचे उद्योग असून मीठ, कापूस, द्राक्षे व इतर फळे आणि पेट्रोलियमचा मोठा व्यापार आहे. वर्षातून सु. चार महिने हे बंदर गोठलेले असते.
लिमये, दि. ह.