पेत्रोपेव्हलॉफ् स्क : आशियाई रशियाच्या कझाकस्तान प्रजासत्ताकातील शहर. ते इशिम नदीच्या उजव्या तीरावर वसले असून आल्माआता या राजधानीच्या वायव्येस सु. १,४०८ किमी. व ऑम्स्कच्या पश्चिमेस २७३ किमी. आहे. लोकसंख्या १,७३,०० (१९७० अंदाज). स्टेप या गवताळ प्रदेशात मोडणाऱ्या या शहराच्या आसमंतातील प्रदेशात गव्हाचे पीक फार मोठ्या प्रमाणावर येते. साहजिकच येथे त्यावर आधारित उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत. किरगीझ टोळ्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी एका किल्लेवजा स्वरूपात हे शहर १७५२ मध्ये अस्तित्वात आले. लवकरच त्याला मध्य आशियातील शेतमाल व यूरोपीय रशियामधील औद्योगिक माल यांचे विनिमय केंद्र म्हणून महत्त्व आले. येथे गहू, कापूस, चहा, केसाळ कातडी, गुरे, लाकूड यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. हे ट्रान्स-सायबीरियन व ट्रान्स-कझाकस्तान लोहमार्गांवरील महत्त्वाचे प्रस्थानक आहे. हे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे मांस डबाबंदीकरण, चामडी कमावणे या उद्योगधंद्यांखेरीज कृषिअवजारनिर्मितीसारखे पायाभूत उद्योगधंदे विकसित झाले आहेत. शहराची वाढ विसाव्या शतकारंभापासून झपाट्याने झाली. शहरामध्ये नाट्यगृह, शिक्षक-प्रशिक्षण केंद्र, दूरचित्रवाणी केंद्र इ. आधुनिक सुविधा आहेत.

फडके, वि. शं.