एस्कर : हिमक्षेत्राच्या विशिष्ट तऱ्हेच्या निक्षेपण कार्याने निर्माण झालेले नागमोडी लाबंट आकाराचे उंचवटे वा डोंगर. फिनलंड, पूर्व प्रशिया, स्वीडन, उत्तर इंग्‍लंड, स्कॉटलंड, उत्तर संयुक्त संस्थाने या ठिकाणी प्रामुख्याने एस्कर आढळतात. एस्करची उंची ३ ते ३० मी. व लांबी ९० मी. ते २ — ४ किमी. असते. यात निरनिराळ्या ठिकाणी बराच फरक दिसून येतो. एकाच एस्करच्या विभिन्न भागांतही उंची व जाडी वेगळी असू शकते. संयुक्त संस्थानांतील मेन प्रांतात तर एस्करची लांबी १६० किमी. पर्यंत आढळते. एखाद्या नदीप्रमाणे एस्करच्याही शाखा व उपशाखा असू शकतात. अंदाजे दहा लाख वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या हिमयुगात हिमक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रदेशावर झालेला होता. हवामानातील बदलानुसार हिमक्षेत्राच्या विस्तारात बदल होत असे. हिमयुगाच्या अखेरीस बर्फ साठण्यापेक्षा वितळण्याचे प्रमाण वाढू लागले व हिमक्षेत्राची वाटचाल बंद होऊन त्याचे आकसणे चालू झाले. अशा वेळी हिमक्षेत्रांतर्गत बोगदे निर्माण होऊन त्यांतून वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचे प्रवाह वाहू लागले. अशा तऱ्हेने आतून वाहणाऱ्या प्रवाहांचे एक जाळेच निर्माण होऊन या प्रवाहांनी वाहून आणलेली वाळू व गोटेमिश्रित गाळ या बोगद्यांत साचला व कालांतराने हिमक्षेत्र पूर्ण वितळल्यावर या गाळाचे एस्कर तयार झाले.

 

वाळू व गोटे यांच्या मिश्रणामुळे एस्करवरील पाण्याचा त्वरित निचरा होतो. याकारणाने त्यांच्या माथ्यावर झाडी फारशी वाढत नाही. काँक्रीट तयार करण्यास व इतर बांधकामास या मिश्रणाचा चांगला उपयोग होतो.

 

कुलकर्णी, गो. श्री.