रांजणगाव : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ३,५२६ (१९८१). हे पुणे-नगर रस्त्यावर पुण्याच्या ईशान्येस ५० किमी. अंतरावर आहे. येथील गणपती श्रीगणपती अथवा महागणपती म्हणून ओळखला जातो. गणपतीचे देवालय पूर्वाभिमुख असून ते हेमाडपंती बांधणीचे आहे. सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यांच्या मध्यकाली सूर्यकिरण बरोबर मूर्तीवर पडावेत, अशी देवालयाची रचना करण्यात आलेली आहे. मंदिराचा गाभारा थोरले माधवराव पेशवे यांनी, तर मुख्य सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांना बांधला.

या स्थानाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते : प्राचीन काळी त्रिपुरासुराने सर्व देव-देवतांची दाणदाण उडवून दिली. तेव्हा नारदांच्या सांगण्यावरून शंकरासह सर्व देव-देवतांनी युद्ध थांबवून तपश्चर्या करून गजाननाला प्रसन्न करून घेतले. गजाननाने दिलेल्या बीजमंत्रामुळे शंकराला त्रिपुरासुराचा वध करता आला. त्या जागी शंकराने ‘मणिपूर’ नावाचे नगर वसविले. मणी म्हणजे रांजण, म्हणून या क्षेत्राचे नाव ‘रांजणगाव’ असे पडले असावे.

मंदिरातील आजच्या पूजामूर्तीच्या खाली तळघरात दुसरी एक लहान मूर्ती असून ती मूळ गणेशमूर्ती असल्याचे सांगितले जाते. या गणेशाचे ‘महोत्कट’ असे नाव आहे. इस्लामी आक्रमणाच्या काळात ती तळघरात लपवून ठेवली, तेथेच ती आजही आहे. या मूळ श्रीमूर्तीला १० सोंडा व २० हात असल्याचे सांगितले जाते. देवालयातील आजची पूजामूर्ती डौलदार असून तिचे ध्यान प्रसन्न आहे. कपाळ रुंद, आसनमांडी, सोंड डावीकडे वळलेली व बाजूला ⇨ऋद्धि-सिद्धि, अशी ही मूर्ती आहे. येथील देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. रांजणगावचा परिसर बागायती असून तेथून संत्र्यांचा व मोसंब्यांचा मोठा व्यापार चालतो.

चौधरी, वसंत