हरगोविंदपूर : श्रीहरगोविंदपूर. भारतातील पंजाब राज्याच्या गुरदासपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व शिखांचे धार्मिक स्थळ. लोकसंख्या सु. ५,००० (२०११). हे बियास नदीच्या उजव्या काठावर, गुरदासपूरच्या आग्नेयीस सु. ३६ किमी.वर वसले आहे. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिखांचे पाचवे धर्मगुरू अर्जुनदेव यांनी याची स्थापना केली व आपला उत्तराधिकारी मुलगा गुरू हरगोविंद यांच्या नावावरून शहराला हे नाव दिले असे सांगितले जाते तर काहींच्या मते, हे नावगुरू हरगोविंदांच्या नंतर देण्यात आले असावे. गोविंदपूर, श्रीहरगोविंदपूर या नावांनीही ते ओळखले जाते. हरगोविंदांनी मोगलांपासून संरक्षणासाठी शहराभोवती तटबंदी केली असून शहरात प्रवेश करण्यासाठी या तटबंदीला पाच प्रवेशद्वारे आहेत. शहरातील शाहिदी गुरुद्वारा दमदमा साहिब प्रसिद्धअसून मोगलांबरोबरच्या युद्धांत हुतात्मा झालेल्या १७,००० शिखांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते बांधण्यात आले आहे. याशिवाय योजनाबद्ध बांधलेल्या ४० विहिरी, गुरूने मुसलमानांना बक्षीस दिलेले गुरुकी मशीद, अनेकमंदिरे व गुरुद्वारा, किल्ला, जनानखाना इ. इतिहासांची साक्ष देणाऱ्या वास्तू येथे आहेत.

चौंडे, मा. ल.