पिंथॉन बंधु : स्पॅनिश समन्वेशक. पिथॉन कुटुंब हे स्पेनमधील पॅलोस येथील. त्यांच्या मालकीची जहाजे होती. मार्तीन आलॉन्सो, फ्रांथाक्सो मार्तीन आणि व्हिथेंते यान्येथ हे तीन बंधू अमेरिकेच्या शोधमोहिमेत क्रिस्तोफऱ कोलंबसबरोबर होते.

मार्तीन आलॉन्सो : (१४४० ?-२० मार्च १४९३). जन्म स्पेनमधील पॅलोस येथे. १४९२ साली पॅलोसहून निघालेल्या कोलंबसच्या पहिल्या सफरित ‘पिंता’ या गलबताचा हा कप्तान, तर फ्रांथीस्को मार्तीन (१४४० ?-१४९३ ?) हा मार्गदर्शक होता. कोलंबसशी त्यचे मतभेद झाल्याने त्या वर्षाच्या अखेरीस काही महिने तो कोलंबसच्या मोहिमेतून फुटून बहुधा सोन्याच्या खाणींच्या शोधार्थ हती बेटांकडे गेला. परतीच्या प्रवासातही नव्या शोधाचे श्रेय मिळविण्याच्या उद्देशाने कोलंबसच्या आधी स्पेनला पोहोचण्याचा त्याने विफल प्रयत्न केला.

व्हिथेंते यान्येत : (१४६० ?- १५२३ ?). जन्म पॅलोस येथे. कोलंबसच्या पहिल्या सफरीतील ‘निना’गलबताचा कप्तान. या सफरित तो शेवटपर्यत कोलंबसबरोबरच राहिला. हवान दीआथ दे सोलीसबरोबर व्हिथेंतेने दोन सफरि केल्या. १४९७-९८ मधील हॉंडुरसच्या आखातापर्यंतची पहिली आणि १५०८-०९ मधील द. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरिल ला प्लातापर्यतची दुसरी. इ. स. १५०० च्या प्ररंभी चार नौकांसह नैऋत्य दिशेस अटलांटिक महासागर पार करून ७ फेब्रुवारी १५०० रोजी तो ब्राझीलच्या किनार्‍यावरिल सँतू अगस्तीन्यू भूशिरावर पोहोचला. त्यानंतर तो साऊं रॉक भूशिराला वळसा घालून उत्तरेला गेला असावा. पुढे त्याच किनार्‍यावरून वायव्य दिशेस जाऊन अमेझॉन नदीच्या मुखाचा शोध लावल्यानंतर सध्याच्या कोस्टा रीका येथे आला. हैतीच्या (हिस्पॅनीओला) भूमीजवळून पुढे आल्यावर बहामा बेटांदरम्यान दोन नौकांच्या नुकसानीमुळे सप्टेंबर १५०० मध्ये तो पॅलोसला परतला. नव्याने शोधलेल्या भूभागाचे त्याला गव्हर्नरपद देऊ केले परंतु त्याने ते नाकारले.

स्पइस (मोल्यूकस) बेटांकडे जाण्याचा पश्चिमी मार्ग शोधण्यासाठी व्हिथेंते १५०८ मध्ये सोलीसबरोबर मध्य अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याने निघाला. या मोहिमेत त्याने हॉडुरस व युवकातानचा शोध लावला, की दक्षिणेस व्हेनेझुएला व ब्राझील येथे तो गेला, याबद्दल अनिश्चितता आहे. काहींच्या मते तो ला प्लाता खाडीपर्यत गेला असावा. एरेराच्या मते या सफरीत व्हिथेंते ४० द. अक्षवृत्तापर्यत (ला प्लाताच्याही दक्षिणेस) गेला होता. ऑगस्ट १५०९ मध्ये तो स्पेनला परतला. १५२३ नंतर व्हिथेंतेच्या जीवनाबद्दल माहिती मिळत नाही.

चौधरी, वसंत