तंबोरे तयार करण्याचा व्यवसाय, मिरज

मिरज : महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचे कर्नाटक सीमेजवळील मुख्य ठिकाण. हे सांगलीच्या आग्नेयीस ९·६५ किमी व कोल्हापूरच्या पूर्वेस सु. ४८ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,०५,४५५ (१९८१). मिरज द. मध्य रेल्वेच्या पुणे-बंगलोर लोहमार्गावरील एक महत्त्वाचे प्रस्थानक असून ते कोल्हापूर, सांगली (माधवनगर), गोवा, पंढरपूर इ. ठिकाणांशी लोहमार्गाने जोडलेले आहे. या प्राचीन नगरीने दहाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे, पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या.

शुद्ध आरोग्यवर्धक हवा, शुद्ध पाणी-पुरवठा व भूमिगत नहर ही मिरजेची वैशिष्ट्ये होत. भुईकोट किल्ला, संत वेणाबाईचा मठ व मिरासाहेबांचा दर्गा ही येथील काही ऐतिहासिक स्थाने आहेत. शहरात राज्य व केंद्रशासनाची विविध कार्यालये आहेत.

येथील वानलेस रुग्णालय व कृपामयी मनोपचार केंद्र प्रसिद्ध आहे. शहरात कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, माध्यमिक, प्राथमिक शाळा इ. शैक्षणिक सुविधा आहेत.

कोकण व गोवा प्रदेशांच्या मार्गांवरील या व्यापारी केंद्रात धान्य व भाजीपाला यांचा मोठा व्यापार चालतो. पूर्वीपासून मिरजेत तंतुवाद्ये तयार करण्याचा व्यवसाय घरोघरी चालत असून ही तंतुवाद्ये परदेशीही पाठविली जातात.

इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे किराणा घराण्यातील प्रसिद्ध गायक खांसाहेब अब्दुल करीमखाँ बाळकृष्णपंत शिखरे व पुंडलिकजी कातगडे हे स्वातंत्रसैनिक मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीमंत राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्या येथील वास्तव्यामुळे मिरज शहराला आगळे महत्त्व प्राप्त झाले.

पाठक अनाथ अर्भकालय, अपंगगृह, चार ग्रंथालये, शंभरांवर औद्योगिक कारखाने, बालगंधर्व नाट्यगृह, पाच चित्रपटगृहे इ. सुविधा शहरात आहेत. सूत आणि सूतधंद्यास उपयुक्त अशी यंत्रे मिरजेतून परदेशात जातात. औषधकंपन्यांची गुदामेही येथे आहेत.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय येथे असून मिरजेतूनच भारतातील सर्व राज्यात होणाऱ्या संगीत परीक्षा संघटित केल्या जातात. या संस्थेने भारतातील संगीत ध्वनिमुद्रिकासंग्रह प्रथमच केला असून संगीत शिक्षकांना, संशोधकांना तसेच कलावंतांना हे मोठेच आकर्षण आहे. कृष्णा नदीवर मिरज – अर्जुनवाड पूल व रेल्वे ओलांडी पूल झाल्याने मिरज-कर्नाटक राज्य, मिरज- कोल्हापूर ही वाहतूक सुलभ झाली आहे. आठ दिशांना नगरविकासास वाव आहे. भिन्नभिन्न धर्मांचे व भाषांचे लोक मिरजेत असल्याने येथे छोट्या भारताचे दर्शन होते. मिरजेतील अंबाबाई व भानू तालीमसंस्था साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी पावल्या आहेत.

अमेरिकेतून व अरब देशांतून येथ परकीय प्रवासी औषधोपचारार्थ येत असल्याने मिरजेत अद्ययावत हॉटेलांची सोय नित्य वाढत आहे.

संगीत कला विहार हे मराठी – हिंदी मासिक व दोन दैनिक वृत्तपत्रे मिरजेत प्रसिद्ध होतात.

घोरपडे, दि. रा.