गोपालपूर : ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यातील, बंगालच्या उपसागरावरील एक दुय्यम प्रतीचे बंदर व पर्यटनकेंद्र. लोकसंख्या ३,५८३ (१९७१). हे आग्नेय रेल्वेच्या विशाखापटनम् ते कलकत्ता लोहमार्गावरील बेऱ्हमपूरच्या आग्नेयीस १४·५ किमी. आहे. गोपालपूरला जाण्यास बेऱ्हमपूरपासून मोटार वाहतुकीची सोय आहे. येथून तांदूळ, तेलबिया, मासे, लाकूड निर्यात होते आणि वनस्पती तेल, रॉकेल, आगकाड्या व कापड आयात होते. वारा व वाळूच्या दांड्यामुळे दिवसेंदिवस हे बंदर निकामी होत होते पण स्वातंत्र्योत्तर काळात पर्यटनकेंद्र व बंदर म्हणून याचा विकास करण्यात आला. 

कांबळे, य. रा.