नागोया शहराचे विहंगम दृश्य

नागोया : (चुक्यो). जपानचे एक प्रमुख औद्योगिक शहर व बंदर व आयची जिल्ह्याची राजधानी. लोकसंख्या २०,७९,६९४ (१९७५अंदाज). हे होन्शू बेटावर ईसे उपसागराच्या उत्तरेस टोकिओच्या नैर्ऋत्येस २६०किमी. व ओसाकाच्या ईशान्येस १४४किमी. वर टोकैडो या प्रमुख महामार्गावर आहे. सतराव्या शतकातील वाढीनंतरच्या मेजी पुनःस्थापनेनंतर नागोयाचा विकास खुंटला होता, पण १८८०नंतर रेल्वेमार्गांमुळे विकास वेग वाढला. सुरुवातीच्या घड्याळे, सायकली आणि शिवणयंत्रे या उद्योगांबरोबर कापड, चिनी माती, सिमेंट, यंत्रे, लाकूडकाम, मद्य आणि अन्नप्रक्रिया हे उद्योगही सुरू झाले. पहिल्या महायुद्धानंतर अवजड उद्योग, विमान कारखाने, पोलाद उद्योग, रसायन, मोटारी, जहाजबांधणी व खनिजतेल शुद्धीकरण कारखाने स्थापन झाले. येथील कारखान्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथे परंपरागत उद्योगही चालू आहेत. ‘सेतो’ ही प्रसिद्ध चिनी मातीची भांडी येथेच बनतात. सोळा गावांसह बृहत्‌नागोयाचे क्षेत्रफळ ५१०चौ. किमी. व लोकसंख्या ६५,७४,८४७ (१९७०) आहे. शहरात नवीन सिमेंट काँक्रीटच्या आणि जुन्या लाकडाच्याही इमारती आहेत. शहराचा विस्तार अलीकडे अत्यंत सखल भागातही झाला आहे. १९७०मध्ये येथे नागोया विद्यापीठासह ४विद्यापीठे, सु. ३३महाविद्यालये व ८००शाळा आणि ५लाखांवर विद्यार्थी होते. आटसुटा जींगू आणि ईसे जींगू हे मठ, तोकुगावा वस्तुसंग्रहालय, सतराव्या शतकातील किल्ला, तेथील चित्रसंग्रह व वस्तुसंग्रह, आयची सांस्कृतिक केंद्र व कला केंद्र इत्यादींमुळे नागोया हे मोठे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. येथे भुयारी रेल्वे, भुयारी बाजारकेंद्रे, ३०० वर उद्याने असून चुनिची शिंबुन हे प्रमुख वृत्तपत्र येथूनच निघते. शहरात अनेक क्रीडा-संस्था व व्यायामसंस्था असून सहा चित्रवाणी व चार नभोवाणी केंद्रे आहेत. ७६ निर्वाचित सदस्यांच्या नगरसभेच्या साहाय्याने येथील महापौर शहराचा कारभार पाहतो.

डिसूझा, आ. रे.