अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५५,५४४ (१९७१). हे बोरी नदीच्या काठी वसलेले असून त्याचे क्षेत्रफळ ९.६ चौ.किमी. आहे. येथे १८८४ साली नगरपालिका स्थापन झाली. अमळनेरला एक महाविद्यालय, एक तत्त्वज्ञानमंदिर व तीन विद्यालये आहेत. येथून एक मराठी साप्ताहिक निघते.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय हमरस्त्यावरील धुळे शहरापासून अमळनेर ३९.४ किमी. ईशान्येस असून सुरत-भुसावळ रुंदमापी रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. कापूस, शेंग, ज्वारी व मिरची यांची ही मुख्य बाजारपेठ असून येथे एक मोठी कापड-गिरणी आहे. तेल गाळणे, वनस्पती-तूप इ. महत्त्वाचे उद्योगधंदे चालतात. येथे वार्णेश्वर (महादेवाचे मंदिर) व खार्टेश्वर (रामाचे मंदिर) ही दोन प्राचीन मंदिरे असून सखारामबुवा या संतांची मोठी यात्रा वैशाखी पौर्णिमेस भरते. 

कुलकर्णी, गो. श्री.