कृष्णगिरी : तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे. लोकसंख्या ३५,३८३ (१९७१). हे बंगलोरच्या आग्नेयीस ८० किमी. असून येथून बंगलोर, मद्रास व सेलमला हमरस्ते जातात. दक्षिण रेल्वेच्या मद्रास सेलम फाट्यावर तिरुपतूरला ३८ किमी. अरुंद मापी लोहमार्गाने हे स्थानक जोडले आहे. गावामागे २४८ मी. उंचीच्या टेकडीवरील टिपूने बांधलेला अभेद्य किल्ला ब्रिटिशांनी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर १७६८ मध्ये वेढा घालून जिंकला. गावात एरंडीचे तेलघाणे आणि कातडी कमावणे हे मुख्य धंदे असून, भोवतालच्या प्रदेशाचे उत्पादन उत्तम द्राक्षे व आंबे, शेंगदाणा व तीळ हे आहे.

ओक, शा. नि.