यांगचू : सांप्रतचे ताइयूआन. चीनमधील शेन्सी प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १७,५०,००० (१९८३ अंदाज). उत्तर चीनमधील शेन्सी प्रांताच्या मध्यभागी, ह्‌वांग हो (पीत) नदीच्या फेन या उपनदीतीरावर हे वसले आहे. प्राचीन जौ राज्यातील चिन-यांग नावाचे एक मोक्याचे ठिकाण येथे होते. च्यीन राजघराण्याने जौ राज्याचा पाडाव केल्यानंतर (इ. स. पू. २२१) ते ताइयूआन जिल्ह्याच्या सेनाधिकाऱ्याचे मुख्य ठाणे बनले. हान राजवटीत (इ. स. पू. २०२ ते इ. स. २२०) व त्यानंतर थांग राजवटीतही याला राजधानीचा दर्जा होता. दरम्यानच्या काळात शहराचा विस्तार होऊन ते बौद्ध धर्माचे केंद्र बनले. जुने शहर हे विद्यमान शहरापासून पूर्वेस काही किमी. अंतरावर होते. सुंग राजवटीत फेन नदीच्या काठावर सध्याच्या नवीन शहराची स्थापना करण्यात आली (इ. स. ९८२). मंगोल काळाच्या अखेरीपर्यंत (१३६८) वेगवेगळ्या नावांनी त्याचा राजधानीचा दर्जा कायम राहिला. मिंग राजघराण्याच्या कारकीर्दीत (१३६८–१६४४) याचे ‘ताइयूआन फू’ (फू = मुख्य नगर) असे नामकरण करण्यात आले व तेच नाव १९१२ पर्यंत कायम राहिले. १९१२ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यानंतर याला यांगचू असे नाव देण्यात आले व ते १९४७ पर्यंत कायम राहिले. त्यानंतर मात्र ते ताइयूआन याच नावाने ओळखले जाते. चीन–जपान युद्धानंतर जपानी अंमलात (१९३७) येथील लोहमार्ग व विमानतळ बांधण्यात आले, त्यामुळे शहराचे महत्त्व वाढले. १९१२–४८ या काळात येन ह्‌सी-शान या शेन्सीच्या प्रभावी सेनानीने येथील आधुनिक उद्योगधंद्यांचा पाया घातला. १९४९ पासूनच्या कम्युनिस्ट राजवटीत औद्योगिकीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत येथील औद्योगिक विकास वेगाने घडवून आणला.

समृद्ध अशा लोह व कोळसा क्षेत्रात वसलेले असल्याने तसेच वाहतूक साधनांच्या विकासामुळे येथील औद्योगिक विकास झपाट्याने झाला. हे एक महत्त्वाचे खाणकाम व प्रगलन केंद्र असून अभियांत्रिकी उद्योगांचे येथे जाळेच निर्माण झाले आहे. यंत्रे, कृषी अवजारे, कापड, रसायने, खते, प्लॅस्टिक, सिमेंट, कागद-उत्पादन, अन्नधान्य प्रक्रिया इ. उद्योगधंदे येथे चालतात. शहराचा परिसर समृद्ध कृषिक्षेत्र असल्याने कृषिमाल प्रक्रिया व त्याचा मोठा व्यापार येथे चालतो. तंत्रविद्या व उपयोजित विज्ञान या प्रमुख शिक्षण व संशोधन केंद्रांशिवाय शेन्सी विद्यापीठ, शिक्षक-प्रशिक्षण, कृषी, अभियांत्रिकी, तंत्रविद्या व वैद्यकीय महाविद्यालये इ. शैक्षणिक संस्था येथे आहेत. आधुनिक शिक्षण व अवजड उद्योग यांमुळे ताइयूआन हे चीनचे ‘नमुनेदार शहर’, तर शेन्सी हा ‘नमुनेदार प्रांत’ म्हणून ओळखला जातो.

चौधरी, वसंत