मोबील :अमेरिकेच्या ॲलाबॅमा राज्यातील एक शहर आणि मेक्सिको आखातावरील प्रसिद्ध बंदर व मोबील परगण्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या २,००,४५२ (१९८०). त्यांपैकी ३६% लोक कृष्णवर्णीय आहेत. हे मोबील उपसागराजवळ मोबील नदीच्या पश्चिम तीरावर वसले आहे. ॲलाबॅमाची राजधानी मंगमरीच्या नैर्ऋत्येस २०९ किमी.वर, मेक्सिकोच्या आखातापासून सु. ४८ किमी. आत ते आहे.

फ्रेंचांनी १७०२ मध्ये येथून उत्तरेस ४३ किमी. वर पहिली वसाहत स्थापन केली परंतु पूर व दुष्काळ यांच्या त्रासामुळे १७१० मध्ये सांप्रतच्या जागी वसाहत हलविण्यात आली. १७११–१९ यांदरम्यान ते फ्रेंच लुइझिॲना प्रदेशाची राजधानी होते. अमेरिकेच्या ताब्यात जाण्यापूर्वी ते फ्रान्स, इंग्लंड (१७६३) व स्पेन (१७८०) यांनी घेतले होते. १८१३ मध्ये त्यावर अमेरिकेने ताबा मिळविला. यादवी युद्धकाळात संघराज्यवादी संस्थानांचे ते महत्त्वाचे बंदर होते. यादवी युद्धातील प्रसिद्ध मोबील उपसागराचीलढाई येथेच झाली (५ ऑगस्ट १८६४). दुसऱ्या महायुद्धकाळात येथील जहाजबांधणी उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला.

वायुमार्ग, जलमार्ग व लोहमार्ग यांनी शहर देशातील प्रमुख भागांशी जोडले आहे. जहाजबांधणी व कागदनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग. अन्य उद्योगांत सिमेंट, अँल्युमिनियम, कापड उद्योग, नौवहन उपकरणे, लोखंड, पोलाद, रासायनिक उद्योग, तेलशुद्धीकरण, अन्नपदार्थ प्रक्रिया इत्यादींचा अंतर्भाव होतो. येथील कापूस बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

‘अझेलिया ट्रेल’ या नावाने प्रसिद्ध असलेला २७ किमी. लांबीचा व दुतर्फा फुलझाडे असलेला सुंदर मार्ग प्रसिद्ध आहे. फोर्ट काँडे या ठिकाणी १७२४ मधील स्पॅनिश तोफखाना जतन करून ठेवण्यात आला आहे. शहराच्या दक्षिणेस ३२ किमी. वर बेलिनग्राथ हे मोठे उद्यान आहे. अमेरिकेची ॲलबॅमा ही युद्धनौका आणि ‘ड्रम’ ही पाणबुडी येथील बंदरात प्रदर्शनार्थ ठेवली आहे. नाट्य व तत्सम कलाप्रयोगांची सोय असलेले महानगरपालिकेचे सभागृहही येथे आहे. शहराचा कारभार तीन आयुक्तांमार्फत चालतो. चार वर्षांसाठी त्यांची निवडणुक होते. प्रत्येक निर्वाचित आयुक्त १६ महिने महापौर म्हणून काम करतो. बंदरातील आयात-निर्यात मालात अन्नधान्ये, औद्योगिक आणि खनिज पदार्थ यांचा अंतर्भाव होतो. सागरगामी बोटींसाठी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. येथे दक्षिण ॲलबॅमा विद्यापीठ (स्था.१९६३), १२ नभोवाणी केंद्रे व ३ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत.

मिसार, म. व्यं.