तोरणमाळ : धुळे जिल्ह्याच्या अक्राणी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ९९१ (१९७१). हे धुळ्याच्या उत्तरेस सु. १४५ किमी. असून शहादे–राणीपूर मार्गे येथे मोटार रस्त्याने जाता येते. हे गाव सातपुडा पर्वताच्या सदाहरित वनश्रीने नटलेल्या डोंगररांगांत १,०३६ मी. उंचीवर वसलेले आहे. येथील तापमान ४·४° से. ते १५·५° से. व पर्जन्यमान १०१·६ सेंमी. असते. पूर्वी येथे मांडू वंशाच्या राज्याची राजधानी होती. डोंगरावर विर्स्तीण पण अरुंद असे सु. ४१ चौ. किमी. चे पठार आहे. येथील सुंदर नैसर्गिक यशवंत तलाव, दीड किमी. वरील सीताखाई दरी व प्रतिध्वनी टोक ही ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे आहेत. मुख्यतः धुळे व जळगाव जिल्ह्यांसाठी येथे सुट्टीतील निवासस्थाने (हॉलीडे कँप्स) बांधलेली आहेत. पठारावर गोरखनाथ, पारसनाथ व नागार्जुन यांची मंदिरे असून नागपंथी मठही आहे. प्रतिवर्षी ऑक्टोबरमध्ये येथे मोठी जत्रा भरते.

कांबळे, य. रा.