वॉरन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ऱ्होड आयलंड राज्याच्या ब्रिस्टल परगण्यामधील एक औद्योगिक शहर, बंदर व आरोग्यधाम. लोकसंख्या १०,६४० (१९८०). हे किकम्यूइट व वॉरन या दोन नद्यांवर, नॅरागँसिट उपसागराच्या मुखाशी वसले असून ते प्रॉव्हिडन्स शहराच्या आग्नेयीस सु. २४ किमी. अंतरावर आहे. प्रारंभी हे मॅसॅचूसेट्‌स राज्यातील सॉन्झी गावाचा एक भाग होते व ‘सोवॉम्सेट’ या नावाने ओळखले जात होते. तेथे मॅससॉइट या वांपानोआग इंडियन प्रमुखाची वसती होती. १६३२ मध्ये इंग्रजांनी येथे एक व्यापारी ठाणे उभारले. १७४६ मध्ये वॉरनचा ऱ्होड आयलंड राज्यात समावेश करण्यात आला. १७४७ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला व ब्रिटिश उपनौसेनाधिपती सर पीटर वॉरन (१९०३-५२) याच्या नावावरून शहरास सांप्रतचे नाव देण्यात आले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धकाळात ब्रिटिशांनी या शहराची लूट व जाळपोळ केली (१७७८). त्याच वर्षी फ्रेंच सेनानी मार्की द लाफायेत (१७५७-१८३४) याने हे काबीज करून तेथे आपले मुख्यालय स्थापन केले.

वॉरन हे औद्योगिक व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. जहाजबांधणी व मासेमारी, विशेषतः देवमाशांची शिकार, हे येथील प्रमुख उद्योग होत. येथे अवजड सामान, विद्युत्  साहित्य व जडजवाहीर यांचे निर्मितीउद्योग आहेत. यांशिवाय शहरात सागरी खाद्यपदार्थ डबाबंदीकरण, पिशव्या आणि विविध वस्त्रे यांसाठी वापरात येणारे प्लॅस्टिकचे धागे, प्लॅस्टिके, रबरी आच्छादने, मोटारगाड्यांचे सुटे भाग, मालमोटारी, सरकबदं पट्‌ट्या (झिपर) आणि प्रवासी साहित्य इत्यादींचे उत्पादन होते. येथील ऱ्होड आयलंड महाविद्यालयाचे (स्था.१७६४) पुढे प्रॉव्हिडन्स येथील ब्राउन विद्यापीठात विलिनीकरण करण्यात आले (१८०४). वॉरन हे पर्यटकांसाठी विशेष विख्यात आहे.

संकपाळ, ज. बा.