ईस्ट इंडीज : आग्‍नेय आशियातील मलाया द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे न्यू गिनी बेटापर्यंत पसरलेल्या द्वीपसमूहास ईस्ट इंडीज असे नाव देण्यात येत असे. कोलंबस समुद्रमार्गे भारताला जाण्याचा संकल्प करून यूरोप खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरून जो निघाला, तो कित्येक महिन्यांनंतर ज्या बेटांवर पोहोचला, तोच भारत असे तो समजला. परंतु त्याची ही चूक नंतर लक्षात येऊन मेक्सिकोच्या आखाताच्या आग्‍नेयीकडील द्वीपसमूहास वेस्ट इंडीज असे नाव देण्यात आले आणि भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या बेटांस ईस्ट इंडीज असे संबोधण्यात येऊ लागले. त्या वेळी ईस्ट इंडीजमध्ये उत्तर ऑस्ट्रेलिया व आग्‍नेय आशियामधील सर्व बेटांचा समावेश होत असे. पुढे एकोणिसाव्या शतकात या भागात बरीच बेटे डचांच्या मालकीची झाल्याने ईस्ट इंडीज म्हणजेच डच ईस्ट इंडीज व आताचे इंडोनेशिया प्रजासत्ताक असा अर्थ राजकीय दृष्ट्या रूढ झाला.

लिमये, दि. ह.