नायगारा फॉल्स : (शहर). (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यूयॉर्क राज्याच्या नायगारा परगण्यातील प्रवेश बंदर व पर्यटन केंद्र. लोकसंख्या ८५,६१५ (१९७०). हे बफालोच्या वायव्येस सु. २६ किमी. नायगारा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. पूर्वी यास मँचेस्टर असे म्हणत. १८९२ साली शेजारील गावे मिळून नायगारा फॉल्स असे नवीन शहर बनविण्यात आले. १९२७ साली ला सालने हे खालसा केले. येथे ब्रिटिशांनी बांधलेला प्राचीन किल्ला आहे. फ्रेंच व ब्रिटिश यांच्यामध्ये ग्रेट लेक्सवर ताबा मिळविण्याबाबत वारंवार तंटे होत. त्यामुळे हे एक महत्त्वाचे मोक्याचे ठिकाण होते. सध्या हे विद्युत् रासायनिक व विद्युत् धातुशोधनाच्या उद्योगांचे केंद्र आहे. क्लोरीन, फ्ल्युओरीन, कॉस्टिक सोडा, ॲल्युमिनियम, कागद, शस्त्रास्त्रे, ग्रॅफाइट, विमानाचे सुटे भाग, विजेऱ्या इ. उद्योग येथे आहेत. द न्यूयॉर्क स्टेट नायगारा रिझर्व्हेशन या आरक्षित प्रदेशातील (१८८५) प्रॉस्पेक्ट पार्क व डेव्हिल्‌स होल पार्क यांसारखी भव्य उद्याने, नायगारा फॉल्स विद्युत् प्रकल्प, नायगारा विद्यापीठ, वस्तुसंग्रहालय या येथील प्रेक्षणीय गोष्टी आहेत. पर्यटन हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. हे ठिकाण जगद्‍‍विख्यात नायगारा धबधब्याजवळ असल्यामुळे याचे महत्त्व वाढले आहे.

(२) कॅनडातील आँटॅरिओ प्रांताच्या वेलंड परगण्यातील औद्योगिक शहर व प्रयटन केंद्र. लोकसंख्या ६७,१६३ (१९७१). हे बफालोच्या ईशान्येस सु. २६ किमी. नायगारा नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. हे न्यूयॉर्क राज्यातील नायगारा फॉल्स शहराच्या समोर असून त्याच्याशी दोन पुलांनी जोडले आहे. १८५३ मध्ये एल्जिन, १८५६ मध्ये क्लिफ्टन आणि १८८१ साली नायगारा फॉल्स अशी याची नामांतरे झाली. १९०४ साली यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. नायगारा धबधब्यामुळे यास फार महत्त्व आले आहे. हे कॅनडातील लोकप्रिय पर्यटन केंद्रापैकी एक असून ऑँटॅरिओतील विद्युत्‌निर्मितीचे मुख्य ठिकाण, जकात बंदर व औद्योगिक केंद्र आहे. रसायने, खते, यंत्रे, खेळांचे साहित्य, कागद, चांदीची भांडी व अन्नपदार्थ तयार करणे इ. उद्योगधंदे येथे आहेत. क्कीन व्हिक्टोरिया पार्क, ओक्स गार्डन थिएटर ही येथील प्रेक्षणीय स्थळे होत.

कांबळे, य. रा.