ॲसेन्शन बेट : दक्षिण अटलांटिकमधील सेंट हेलीना बेटाच्या वायव्येस १,१२७ किमी.वरील ब्रिटनचे बेट. अक्षांश ७५६’ द. आणि रेखांश १४२२’ प. क्षेत्रफळ ८८ चौ.किमी. लोकसंख्या १,१२९ (१९७२). या ज्वालामुखीयुक्त बेटाची कमाल लांबी १५ किमी. व रुंदी ९ किमी. आहे. ग्रीन मौटनौं हा सु. ८७५ मी. उंच ज्वालामुखी सर्वांत उंच आहे. याच्या भोवतालचा भाग ३०० ते ६०० मी. उंच असून लाव्हाच्या खोल घळ्या हे तेथील वैशिष्ट्य आहे. समुद्रसपाटीस सरासरी तपमान २९.४ से. तर ग्रीन पर्वतावर २३.९ से. असते. पाऊस मार्च-एप्रिलमध्ये, उंच भागात ७५ सेंमी. पडतो. आग्नेय व्यापारी वाऱ्यांमुळे हवा आरोग्यदायक आहे. पूर्वी हे बेट उंचावरील काही भाग सोडल्यास ओसाड होते, पण आज पायथ्याशी काही झाडी व गवत वाढलेले आहे. तेथे गुरे व मेंढ्या पाळतात. नेचे, शेवाळे, खडकी गुलाब, पर्सलेन ही येथील नैसर्गिक वनस्पती होय. शेती मुळीच नाही. ग्रीन पर्वताच्या उतारावर फक्त एकच शेत आहे. जानेवारी ते मे या काळात हजारो समुद्रकासवे किनाऱ्यावर अंडी घालण्यास येतात लोक ती पकडून डबक्यात ठेवतात. दर्जेदार मासेही विपुल सापडतात. काही ससे, वनशेळ्या, रानगाढवे व रानमांजरे दिसतात. पॉर्ट्रिज, सूटी, टर्न हे पक्षी अंडी घालण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. १५०१ मध्ये नोव्हा कास्टेल्ला या पोर्तुगीज नाविकाने ॲस्सेन्शन डे या ख्रिस्ती सणाच्या दिवशी हे बेट शोधले. १८१५ साली सेंट हेलीना येथे नेपोलियन बोनापार्ट ह्यास हद्दपार केल्यानंतर या बेटावर ब्रिटनने काही फौजफाटा ठेवला. गेली १०० वर्षे हे बेट ब्रिटिश नौदलाचे गस्ती ठाणे आहे. १९२२ पासून हा सेंट हेलीना वसाहतीचा उपविभाग बनविला आहे. गस्ती ठाण्यामुळेच बेटावर जॉर्ज टाउन हे शहर निर्माण झाले आहे. येथे ग्वानो व फॉस्फेट‌्स गोळा केली जातात. आफ्रिका व यूरोप यांना जोडणाऱ्या समुद्री केबलचे हे केंद्र आहे. दुसऱ्या महायुद्धात येथे विमानतळ उभारला गेला. तेथून पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका व दक्षिण यूरोपकडे अटलांटिक ओलांडून जाणाऱ्या विमानांना पुनः इंधन भरून घेता येई.

डिसूझा, आ. रे.