रीओ दे जानेरो : ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिका खंडातील साऊँ पाऊलूखालोखाल लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर, प्रमुख बंदर व ब्राझीलची पूर्वीची राजधानी. लोकसंख्या ५६,१५,१४९ (१९८५ अंदाज). देशातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक, व्यापारी सांस्कृतिक व वाहतुकीचे केंद्र म्हणूनही महत्त्वाचे आहे. अटलांटिक महासागराच्या ग्वनबार उपसागराच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर वसलेले रीओ दे जानेरो हे आग्नेय ब्राझीलमधील याच नावाच्या राज्याचे मुख्य ठिकाण सामान्यपणे ‘रीओ’ या नावाने ओळखले जाते. जगातील अतिसुंदर बंदरांमध्ये रीओची गणना होते. कमी उंचीच्या टेकड्यांनी हे बंदर वेढलेले असून त्यांच्या सोंडी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेल्या दिसतात. शुगर लोफ मौंटन (३९५ मी.), कॉर्कुव्हाडू शिखर (७०४ मी.), तेझूका (१,०२१ मी.) व गाव्हिआ (८४१ मी.) ही शहराजवळील उल्लेखनीय नैसर्गिक भूवैशिष्ट्ये आहेत.

गॅस्पर दे लेमोस या पोर्तुगीज समन्वेषकाने १ जानेवारी १५०२ रोजी येथील परिसराचा व ग्वनबार उपसागराचा शोध लावला. त्याने येथील ग्वनबार उपसागर म्हणजेच एका मोठ्या नदीचे मुख आहे असे मानले. जानेवारी महिन्यात येथे आल्यावरूनच त्याने या उपसागराला रीओ दे जानेरो (रिव्हर ऑफ जॅन्युअरी) हे नाव दिले. त्यावरूनच येथील शहराचेही पुढे हेच नाव पडले. १५५५ मध्ये फ्रेंचांनी येथे वसाहत स्थापिली, परंतु पोर्तुगीज वसाहतीचा गव्हर्नर जनरल मे दे सा याने ती उठविली (१५६०−६७).१६६५ मधील पोर्तुगीज सफरीने साऊँ सिबास्त्यँओं दो रीओ दे जानेरो या वसाहतीची स्थापना केली. १७११ मध्ये या वसाहतीचा ताबा फ्रेंचांनी घेतला. ब्राझीलच्या दक्षिण भागात पोर्तुगीजांना सोन्याच्या खाणी सापडल्या, तेव्हा या बंदरापासून पोर्तुगालला सोन्याची निर्यात होऊ लागली. त्यावेळी सोने निर्यातचे हे प्रमुख केंद्र बनून त्याला विशेष महत्त्व आले. सोन्याच्या व्यापारामुळे अनेक वसाहतकार या ठिकाणाकडे आकृष्ट होऊ लागले. १७६३ मध्ये ही ब्राझीलची राजधानी बनली. १९६० पासून ब्राझीलच्या राजधानी रीओ दे जानेरोहून अंतर्गत भागातील ब्राझीलच्या येथे हलविण्यात आली आहे.

सांप्रतच्या शहराची रचना १९०० मध्ये करण्यात आली. त्यासाठी तेथील टेकड्या सपाट करण्यात आल्या, बोगदे खोदण्यात आले, काही ठिकाणचे समुद्रभाग भरून घेतले, उद्यानांची निर्मिती करण्यात आली, दुतर्फा ताडाची झाडे असलेल्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. रीओ बंदर पुरेसे खोल असल्याने मोठमोठी जहाजे बंदरातील धक्क्यांपर्यंत येऊ शकतात. ब्राझीलची जास्तीतजास्त आयात (देशाच्या दोन−पंचमांश) व निर्यात (एक-पंचमांश) याच बंदरातून चालते. लोहखनिज, मँगॅनीज, कॉफी, रबर, साखर, कापूस, तंबाखु, मांस, कातडी, लाकूड इ. मालाची निर्यात या बंदरातून होते. औद्योगिक उत्पादनांत साऊँ पाउलूखालोखाल रीओचा देशात दुसरा क्रमांक लागतो. शहरात वस्त्रोद्योग, खाद्यापदार्थ, घरगुती उपयोगाचे सामान, सिगारेट, रसायने, कातडी वस्तू, विद्युत् साहित्य, धातू उत्पादने, छपाई साहित्य इ. उद्योगधंदे चालतात. शहरात दोन विमानतळे आहेत. उत्तर, दक्षिण व मध्य असे शहराचे मुख्य तीन विभाग पडत असून उद्योगधंदे मुख्यतः उत्तर भागात, तर दक्षिण भाग मुख्यतः निवासी भाग आहे. शहरातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ३२,८०० असून ती न्यूयॉर्क शहरातील घनतेच्या जवळजवळ चैपट आहे. वलाच्छदित पर्वतीय आसमंत, उबदार व आर्द्र हवामान, अटलांटिक महासागर व ग्वनबार उपसागर यांचे सान्निध्य, किनाऱ्या वरील सुंदर पुळणी, निशागृहे, वेगवेगळे उत्सव, पाम वृक्षांच्या आकर्षक मालिका, उद्याने, शहरीतील सुंदर आणि प्रेक्षणीय वास्तू, संग्रहालये, चर्च इत्यादींनमुळे रीओ जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र बनले आहे.

शिक्षण मंत्रालयाची वास्तू, ब्राझीलियन वृत्तपत्र संस्था, आधुनिक कला संग्रहालय, ललित कला राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय ग्रंथालय (स्था.१८१०), नगरपालिकीय संगीतिकागृह, नगरपालिकीय रंग मंदिर, सर्वोच्च न्यायालय, लष्कारी व नौसेना क्लब, इटामारती राजप्रासाद हे येथील वास्तुकलचे सुंदर नमुने आहेत. येथील राष्ट्रीय ग्रंथालय १० लाखांवर ग्रंथ व ६ लाख हस्तलिखिते आहेत. कँडेलेरिया, बेनेडिक्टाइन (सोळावे शतक), फ्रान्सिस्कन (सतरावे शतक) व नोसा सेन्होरा दे ग्लोरिया (अठरावे शतक) ही येथील प्रमुख चर्च आहेत. र्केता दे बोआ व्हिस्ता व जैविक उद्यान (१८०८) यांसारखी सुंदर व प्रसिद्ध उद्याने शहरात आहेत. रीओ दे जानेरो नावाने १९२० मध्ये स्थापना झालेले, परंतु सध्याचे ग्वानबार विद्यापीठ, ब्राझील विद्यापीठ (१९३७), कॅथलिक विद्यापीठ (१९५८), लष्करी व नौसेना अकादमी, ओझवाल्डू क्रूझ जैविक संसोधन केंद्र ह्या येथील प्रमुख शैक्षणिक व संशोधन संस्था आहेत.

चौधरी, वसंत