मँचुरिया : चीनच्या ईशान्य भागातील इतिहासप्रसिद्ध व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा भौगोलिक प्रदेश. क्षेत्रफळ १५,५४,००० चौ. किमी. लोकसंख्या ९,०९,५०,००० (१९८२). मँचुरियाच्या सरहद्दी पूर्वी वेळोवेळी बदलत गेल्याने चीनच्या व शेजारील देशांच्या निरनिराळ्या भागांचा यात कधी समावेश झाला, तर कधीकधी काही भाग त्यातून वगळण्यात आले. विद्यमान मँचुरियात १९५६ पासून चीनच्या हेलुंग जिआंग, कीरिन आणि लिआउनिंग या प्रांतांचा समावेश होतो. ३८° ४० उ. ते ५३° ५० उ. अक्षांश व ११५° २० पू. ते १३५° २० पू. रेखांशांदरम्यान विस्तारलेल्या या प्रदेशाच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस चीनचा इनर मंगोलिया हा स्वायत्त प्रदेश असून वायव्येस, उत्तरेस व पूर्वेस सोव्हिएट रशिया आणि आग्नेयीस उत्तर कोरिया हे देश आहेत. याची दक्षिण सीमा पीत समुद्र व उत्तर चिनी समुद्र यांनी मर्यादित झाली असून शन्‌यांग (मूकडेन) हे या प्रदेशाचे प्रमुख केंद्र आहे.

भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने मँचुरियाचे मध्य भागातील विस्तृत सखल प्रदेश आणि त्याच्या बाजूचे उंच डोंगर व पठारी प्रदेश असे दोन प्रमुख भाग पडतात. सखल प्रदेशाने मँचुरियाचा बराचसा भाग व्यापलेला असून हा प्रदेश सस. पासून ३०० मी. उंचीचा, सु. ९७० किमी. लांब व ६४० किमी. रुंदीचा आहे. हा अत्यंत सुपीक असल्याने मँचुरियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मात्र हा काळ्या व चेस्टनट मृदेचा भाग अविकसित होता. चिनी वसाहतीनंतर व यांत्रिक शेतीमुळे त्याचा खूपच विकास घडून आला. याच्या पूर्व, उत्तर व पश्चिम दिशांना डोंगररांगा असून दक्षिणेस लिआउडुंग द्वीपकल्पाचा भाग कोरियन उपसागरात गेलेला आहे. या द्वीपकल्पामुळे कोरियन उपसागर व लिआउडुंग आखात यांदरम्यानची सरहद्द बनली आहे.

मँचुरियात १,५०० मी. पेक्षा जास्त उंचीच्या डोंगररांगा फारच थोड्या आहेत. सखल प्रदेशाच्या पश्चिमेला व मंगोलियन पठाराच्या हद्दीवर विन व ग्रेट खिंगन पर्वतरांगा असून उत्तरेस ईलखूरी व लेसर खिंगन पर्वत आहेत. पूर्वेस व आग्नेयीस कोरियाच्या सरहद्दीवर चांगपाई पर्वतरांग पसरलेली असून बाइटो शान (कोरियन-पॅक्तू) हे मँचुरियातील सर्वांत उंच (२,७४४ मी.) मृत ज्वालामुखी शिखर याच रांगेत आहे. पूर्वेंकडील रांगा दाट वनश्रीने व्यापलेल्या आहेत.

मँचुरियातील बहुतेक प्रमुख नद्या मध्य भागातील सखल प्रदेशातून वाहतात. आर्गून, अमूर, उसूरी व यालू या नद्या मँचुरियाच्या अनुक्रमे वायव्य, उत्तर व ईशान्य, पूर्व, आग्नेय सरहद्दी बनल्या आहेत. या नद्यांशिवाय उत्तर भागातील सुंगारी (अमुर नदीची उपनदी), तिच्या नन्नी व मूडान या उपनद्या, दक्षिण भागातील लिआओहो इ. इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. येथील नद्यांची संभाव्य जलविद्युत् निर्मितिक्षमता मोठी असून त्यांचा वर्षातून सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळ जलवाहतुकीसाठी उपयोग होतो.

मँचुरियाचे हवामान विषम, खंडीय प्रकारचे आहे. त्यामुळे जास्त काळ हिवाळा व अल्प काळ उन्हाळा अनुभवास येतो. ऑक्टोबर ते मे या हिवाळ्याच्या काळात या प्रदेशाच्या उत्तर भागात सायबीरियाकडून थंड आणि कोरडे वारे येतात, त्यामुळे उत्तर भागात काही वेळा –४५° सें. पर्यंत तापमान खाली येते तर दक्षिण भागात त्या मानाने तापमान थोडे जास्त असते. उन्हाळ्यात दक्षिण पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या उबदार व आर्द्रयुक्त वाऱ्यांमुळे जुलै महिन्यात सागरकिनारी भागात डायरेन येथे तापमान २८° सें. असते तर उत्तरेकडे अंतर्गत भागात हार्बिन येथे २३° सें. असते. कडक थंडीमुले नोव्हेंबर ते एप्रिल या काळात या प्रदेशातील, विशेषतः उत्तरेकडील, नद्या गोठलेल्या असतात. मँचुरियाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० ते ६० सेमी. असून उन्हाळ्यात पाऊस जास्त पडतो. स्थलपरत्वे पर्जन्यवृष्टीमध्ये फरक दिसून येतो. पूर्वेकडील उंच प्रदेशात १०० सेंमी.पर्यंत, तर पश्चिम भागात ३८ सेमी.पर्यंत पाऊस पडतो.

मँचुरियाचा सु. ३५% भाग जंगलांनी व्यापलेला आहे. पश्चिमेकडील उंच प्रदेशातील मृदा सुपीक असली, तरी पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने दाट जंगले आढळत नाहीत. त्यामानाने पूर्वेकडील उंच प्रदेशात वनसंपदा अधिक असून लाकूड उत्पादनाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे. येथील जंगलांत प्रामुख्याने कोरियन पाइन व लार्च वृक्षांचे प्रमाण अधिक असून देशातील कागद, आगपेट्या इ. उद्योगांसाठी यांचा उपयोग केला जातो. जंगल प्रदेशांव्यतिरिक्त मँचुरियाचा बराचसा भाग गवताळ आहे. येथील जंगलांत वेगवेगळे पक्षी व फरधारी प्राणी आढळतात.

इतिहास : सामान्यपणे उत्तर चीनमध्ये वारंवार आक्रमणे करून, पुष्कळ वेळा त्यावर अधूनमधून आपला अंमल बसविणाऱ्या तुंगूस, तुर्क (पूर्वेकडील), खितान व जर्चेन या टोळ्यांचे वसतिस्थान म्हणून मँचुरिया प्रसिद्ध होता. चीनचे मांचू राजघरणे मँचुरियातीलच. विसाव्या शतकात मँचुरियात चिनी लोकांची वस्ती वाढत गेली.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचा मँचुरियाचा इतिहास हा जपान आणि रशिया यांच्यातील सत्तास्पर्धेचा इतिहास म्हणता येईल. चीन, जपान आणि रशिया या देशांच्या भौगोलिक सीमांच्या आणि एक प्रकारे अर्थव्यवस्थांच्याही दृष्टीने मँचुरियाचे स्थान अत्यंत मोक्याचे होते. १८९५ मध्ये जपानने लिआउडुंग द्वीपकल्प काबीज करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १८९८ से १९०४ यांदरम्यान मँचुरियावर रशियाचे विशेष वर्चस्व होते. जपानविरुद्ध केलेल्या रशियन-चिनी युतीनुसार रशियाने पोर्ट आर्थर येथील नाविक तळ, हार्बिन बंदर व चिनी ईस्ट्रर्न रेल्वेमार्ग यांची उभारणी केली. १९०४–०५ मध्ये झालेल्या रशिया–जपान युद्धात रशियाचा पराभव करून जपानने पोर्ट आर्थर आणि मँजुरियाचा दक्षिण भाग ताब्यात घेतला. परिणामतः मँचुरियावरील रशियाचा प्रभाव उत्तर भागापुरताच मर्यादित झाला. जपानी अंमलात मँचुरियाचा शेतीमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रात विकास घडून आला. १९१८–३१ या कालावधीत चीनचे लष्करी प्रभुत्व या भागात होते. १९३१ मध्ये मूकडेनजवळ बाँबने जपानी रेल्वे उडविण्यात आली. हे निमित्त पुढे करून जपानने सप्टेंबर १९३१ मध्ये दक्षिण मँचुरिया ताब्यात घेतला. राष्ट्रसंघापुढे आपले लष्करी आक्रमण मागे घेण्याची जपानने तयारी दाखविली, तरी प्रत्यक्षात जपानी सैन्याने ही गोष्ट केली नाही आणि मँचूक्बो नावाचे कळसूत्री शासन फेब्रुवारी १९३२ मध्ये तेथे स्थापन केले. ‘मूकडेन प्रकरण’ म्हणून या घटनेचा निर्देश करण्यात येतो. यादवी युद्धामुळे चीनचे लष्करी सामर्थ्य क्षीण झाले होते. उत्तर चीनवर आक्रमण करण्यासाठी जपानला मँचुरियाचा लष्करी तळासारखा उपयोग करता येणे शक्य होते, तसेच जपानच्या नियंत्रणाखालील कोरियालगतचा एक अडसर प्रदेश म्हणूनही त्याचा उपयोग होता. दुसऱ्या महायुद्धकाळात जपानने दगडी कोळसा, खनिज तेल, पोलाद आणि रासायनिक उद्योगधंद्यांचे एक मोठे संकुलच दक्षिण मँचुरियात निर्माण केले. दुसरे महायुद्ध संपण्याच्या सुमारास जुलै १९४५ ते १९४६ या कालावधीत रशियाने या औद्योगिक संकुलातील जवळजवळ निम्मा भाग तेथून हलविला. महायुद्धोत्तर काळात अर्थातच चिनी कम्युनिस्टांचे बळ वाढले आणि १९४८ पर्यंत त्यांनी बहुतेक मोठी शहरे काबीज केली. १९४९–५४ हा काळ म्हणजे कट्टर साम्यवादी शासनकर्त्यांचा म्हणता येईल. या काळात रशियाच्या मदतीने मँचुरियाच्या औद्योगिक क्षेत्राची नव्याने उभारणी करण्यात आली. १९६० नंतर मात्र चीन-रशिया संबंध बिघडले आणि मँचुरियाला लागून असलेल्या चीन-रशिया सरहद्दीवरील रशियाची लष्करी सज्जता वाढली.


आर्थिक स्थिती : कृषिउत्पादने, खनिजे व जंगलसंपत्ती यांच्या व्यापारी उत्पादनातील प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात चीनच्या इतर भागांपेक्षा मँचुरियाचा महत्त्वाचा वाटा आहे. शेती उत्पादनात यांत्रिकीकरणामुळे खूपच प्रगती झालेली दिसून येते. या प्रदेशातील अविकसित भागही लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मँचुरियातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. ३०% क्षेत्रात सोयबीनची लागवड करण्यात येते. सोयाबीनच्या एकूण उत्पादनापैकी सु. ३३% सोयाबीन व सोयाबीन पदार्थ (तेल, पेंड वैगेरे) निर्यात केले जातात. सोयाबीनच्या खालेखाल काउलीआंग (तृणधान्याचा प्रकार) या प्रमुख अन्नधान्य पिकाचे उत्पादन घेतले जाते. लागवडीखालील जमिनीपैकी २५% जमीन या पिकाखाली असून मँचुरियाच्या दक्षिण भागात याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या पिकांशिवाय भात व इतर धान्येही मँचुरियात (विशेषतः आग्नेय भागात) घेतली जातात. सुंगारी नदीखोऱ्यात व उत्तर भागात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गव्हाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. अन्नधान्य पिकांशिवाय या प्रदेशात साखर बीट, कापूस, तंबाखू, फ्लॅक्स, तेलबिया, तीळ इ. नगदी पिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केलेली दिसून येते. मँचुरियात साखर बीटचे उत्पादन करण्यास जपानी लोकांनी प्रथम सुरुवात केली. या प्रदेशात भाजीपाला सर्वत्र केला जातो.

पश्चिम भागात पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. शेळ्या-मेंढ्या, घोडे व गुरे यांचे प्रमाण बरेच असून उंटही काही प्रमाणात दिसून येतात. कुक्कुटपालन व रेशीम उद्योग हे व्यवसायही बऱ्याच भागांत चालू आहेत. लाकूड उत्पादन हा येथील महत्त्वाचा आर्थिक उद्योग असून उत्तरेकडील व पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशांतील जंगलांपासून याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

मँचुरियातील खनिजांचे साठे शोधण्याचे काम जपानी अंमलात सुरू झाले. दगडी कोळशाच्या उत्पादनात या प्रदेशातील फूशुन, फूशिन, बंची इ. महत्त्वाची केंद्रे असून हेलुंग जिआंग प्रांतातील होकँग व श्वांग-या-शान येथे कोळशाच्या खाणी आहेत. कोळशाशिवाय ॲलुनाइट व मॅग्नेडसाइट, मॉलिब्डेनम, तांब्याचे खनिज, शिसे, जस्त, मँगॅनीज इ. खनिजेही काही प्रमाणात सापडतात. फूशुनजवळ खनिज तेलाचेही साठे असून आनशान व बंची येथे लोह खनिजाच्या प्रमुख खाणी आहेत. उत्तर मँचुरियात काही ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडले आहेत. मँचुरियात शेतमाल प्रक्रिया करण्याचे अनेक कारखाने असून त्यांत प्रामुख्याने सोयाबीनचे तेल काढण्याच्या उद्योगाचा समावेश होतो. याशिवाय येथे लोखंड आणि पोलाद, कागद, अवजड यंत्रे, ट्रॅक्टर, रसायने इ. तयार करण्याचे कारखानेही बरेच आहेत. पीत समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी चालते. मँचुरियातील औद्योगिक केंद्रांना सुंगारी व यालू नद्यांवरील विद्युत् प्रकल्पांद्वारा वीज पुरवठा करण्यात येतो.

या प्रदेशात रस्त्यांने व लोहमार्गांचे जाळे असून बहुतेक नद्यांतून जलवाहतूकही केली जाते. नद्या हिवाळ्यात गोठतात त्यावेळी त्यांचा रस्त्यांप्रमाणे वाहतुकीसाठी वापर केला जातो. लोहमार्गाद्वारे किनारी भागतील बंदरे पृष्ठप्रदेशाशी जोडलेली आहेत. मँचुरियाच्या उत्तर भागातून ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग जात असून त्याचाच एक फाटा हार्बिन व पोर्ट आर्थर (लूशून) पर्यंत जातो. हवाई मार्गानेही मँचुरिया हा देशातील इतर भागांशी व अन्य देशांशी जोडलेला आहे.

एकोणिसाव्या शतकात शेजारील देशांतून आलेल्या अनेक लोकांनी येथे वसाहती केल्याचे दिसून येते. आग्नेय भागात कोरियन सरहद्दीजवळ कोरियन लोकांची, तर पश्चिम आणि वायव्य भागांत (इनर मंगोलियाचा भाग) मंगोल लोकांची संख्या जास्त आढळते. मंगोलांशी साम्य असलेले दाउर लोक चीचीहार भागात जास्त आहेत. उत्तर मँचुरियाच्या डोंगराळ प्रदेशात व नन्नी नदीखोऱ्यात तुंगूस जमातीच्या वसाहती आहेत. नन्नी नदीखोऱ्यातील या जमाती सोलन या नावाने ओळखल्या जातात. अमूर व असुरी नद्यांच्या संगमाजवळच्या दलदलीच्या प्रदेशात गोल्ड (ननाई) जमातीचे लोक आढळतात.

मँचुरियात शैक्षणिक दृष्ट्या अनेक सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कृषी, जंगले, अभियांत्रिकी, खाणकाम सर्वेक्षण, मासेमारी, नौकानयन, औषधनिर्मिती इ. क्षेत्रांतील शिक्षणासाठी अनेक महाविद्यालये व इतर प्रशिक्षण संशोधन संस्था येथे आढळतात. यांशिवाय संगीत व इतर ललित कला, चित्रपटनिर्मिती इत्यादींच्या शैक्षणिक सुविधाही उपलब्ध आहेत.

मँचुरियातील बहुतेक लोकवस्ती सखल प्रदेशात व दक्षिण किनारपट्टीच्या भागात एकवटलेली दिसून येते. या भागात शहरांचाही मोठ्या प्रमाणात विकास घडून आल्याचे दिसते. शन्‌यांग, हार्बिन, इ. शहरे प्रशासकीय व निर्मितिउद्योग केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत तर आनशान, बंची, फूशुन इ. शहरे खाणउद्योग व प्राथमिक प्रक्रिया उद्योगांसाठी प्रसिद्ध आहेत.

पहा : कोरिया चीन जपान.

चौंडे, मा. ल.