येनिसे : आशियाई रशियाच्या पश्चिम सायबीरिया प्रदेशातून दक्षिणोत्तर वाहणारी, लांबीने जगातील मोठ्या नद्यांपैकी एक महत्त्वाची नदी. लांबी सु. ४,०९३ किमी. जलनिःसारण क्षेत्र ३५,७४,१८६ चौ. किमी. दक्षिणेस रशिया-मंगोलिया यांच्या सरहद्दीवर उगम पावून उत्तरेस कारा समुद्राला (आर्क्टिक महासागराचा भाग) जाऊन मिळणारी ही नदी पश्चिम सायबीरियन कमी उंचीचा प्रदेश व मध्य सायबीरियन पठारी प्रदेश यांच्यामधून वाहत जाते. ही नदी सायान पर्वतरांगांत उगम पावणाऱ्या बॉल्शॉई येनिसे (बेई खेम) व माली येनिसे (का खेम) या प्रमुख प्रवाहांपासून बनते. यांपैकी माली येनिसे हा प्रवाह मंगोलियात उगम पावून पश्चिमेस वाहत जातो. रशियातील किझिल शहराजवळ उजवीकडून त्याला बॉलशॉई येनिसे हा प्रवाह येऊन मिळतो व येथपासून त्यांचा संयुक्त प्रवाह येनिसे या नावाने ओळखला जातो. या पहिल्या टप्प्यात नदी पश्चिम सायान व पूर्व सायान पर्वतरांगांमधून प्रथम पश्चिमेस व खेमचेक नदीसंगमानंतर उत्तरेस एका खोल दरीतून वाहत जाते. आबाकान शहराजवळ येनिसेला डावीकडून आबाकान नदी येऊन मिळते. किझिल ते आबाकान यांदरम्यानचा नदीप्रवाह अरुंद, उथळ व द्रुतवाहयुक्त आहे. नदीच्या मधल्या टप्प्यातील आबाकान शहरापासून क्रॅस्नोयार्स्क शहरापर्यंतचे पात्र सु. १४ किमी. रुंद व ९ मी. खोलीचे बनले आहे. या भागातील नदीखोरे सुपीक असून अन्नधान्य पिकांसाठी प्रसिद्ध आहे. क्रॅस्नोयार्स्कच्या उत्तरेस लेसोसिबिर्स्क शहराजवळ येनिसे नदीला उजवीकडून अंगारा ही महत्त्वाची उपनदी येऊन मिळते. ही नदी बैकल सरोवर व त्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आणते. अंगारा-येनिसे यांच्या संगमानंतरचे नदीचे पात्र खूपच रुंद व खोल (सु. ९ ते ४० किमी. व १४ ते २३ मी.) बनले असून येथपासून येनिसे नदी खूपच संथ (ताशी ३ ते ४ किमी.) वाहते. या शेवटच्या टप्प्यातील सु. २,४०० किमी.च्या प्रदेशात नदी मूळ पातळीच्या सु. १२२ मी. खाली येते. अंगारा नदी संगमानंतर येनिसे नदी दलदली आणि जंगलयुक्त प्रदेशातून प्रथम वायव्येस व नंतर उत्तरेस वाहत जाते. या भागात नदीच्या दोन्ही काठांवर तैगा प्रकारच्या वनस्पतींची जंगले आढळतात. तर नदीमुखाकडील भागात टंड्रा प्रकारच्या वनस्पती दिसून येतात. या शेवटच्या टप्प्यात डुडिंका शहरानंतर नदी प्रथम वायव्येस, नंतर नैऋत्येस व पुन्हा उत्तरेस वळून काराउई गावाजवळ येनिसे नदीमुख खाडीद्वारे (सु. १६० किमी. लांब व १९ ते ६४ किमी. रुंद) येनिसे आखाताला जाऊन मिळते.

येनिसे नदीला उजवीकडून मिळणाऱ्या नद्यांचे प्रमाण जास्त आहे. या बहुतेक सर्व नद्या तीव्र उताराच्या डोंगराळ प्रदेशातून वाहतात. डावीकडील कमी उंचीच्या प्रदेशाचा उतार पश्चिमेस असल्याने त्या भागातील बऱ्याचशा नद्या पश्चिमेस ओब नदीला जाऊन मिळतात. येनिसेला उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख नद्यांत अंगारा, मिडल अथवा स्टोनी तुंगूस्का व लोअर तुंगूस्का यांचा समावेश होतो. यांशिवाय माना, बोल-पिट, बख्त, कूरेका इ. उजव्या बाजूने, तर कास, सिम, येलगूई, तुरूखान, केट, टानामा इ. नद्या डाव्या बाजूने मिळतात. आबाकान ही डाव्या बाजूने मिळणारी एकच मोठी नदी आहे. कास व केट नद्यांपासून काढलेल्या कालव्यांद्वारे ही नदी पश्चिमेस ओब नदीशी जोडलेली आहे.

नदीखोऱ्यातील हवामानावर आर्क्टिक महासागरावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम दिसून येतो. या भागात तीव्र सायबीरियन प्रकारचे हवामान असल्यामुळे वरच्या टप्प्यात नोव्हेंबर ते एप्रिल या काळात, तर खालच्या टप्प्यात ऑक्टोबर ते जूनच्या सुरुवातीपर्यंत नदीपात्र गोठलेले असते. वरच्या टप्प्यातील द्रुतवाहांवरून बर्फ अचानक पात्रात कोसळल्याने खालच्या टप्प्यात पाण्याची पातळी वाढून बऱ्याच वेळा पूर येतात. त्यामुळे पूरनियंत्रण व वीजनिर्मितीच्या उद्देशाने क्रॅस्नोयार्स्क शहराजवळ मोठे धरण बांधण्यात आले आहे. येनिसे नदीची संकल्पित वीजनिर्मिती क्षमता १,८०,००,००० किवॉ. आहे. नदीच्या खालच्या टप्प्यात पाइन वृक्षांची, तर वरच्या टप्प्यात लार्च वृक्षांची अरण्ये आढळतात.

उत्तरेकडील नदीखोऱ्यात प्रामुख्याने शिकार, मासेमारी, रेनडिअरची पैदास हे व्यवसाय चालतात, तर दक्षिण खोऱ्यात खाणकाम व्यवसाय चालतो. खाणीतून प्रामुख्याने ग्रॅफाइट व कोळसा मिळतो. यांशिवाय सोने, तांबे, निकेल, कोबाल्ट, प्लॅटिनम यांचेही थोड्याफार प्रमाणात उत्पादन होते. याच भागात निर्मिती व प्रक्रिया उद्योगांचा विकास झाला आहे. नदीच्या वरच्या टप्प्यात अरुंद पात्र, द्रुतवाह यांमुळे जलवाहतूक करणे अशक्य ठरते परंतु त्याव्यतिरिक्त सु. ३,५०० किमी. प्रदेशात जलवाहतूक चालते. उत्तर समुद्र मार्गाने (नार्थ सी रूट) जहाजे नदीपात्रातून तुरूखान्स्क शहरापर्यंत येऊ शकतात. नदीमार्गे मुख्यत्वे जंगल उत्पादने व धान्य यांची वाहतूक केली जाते. ईगार्का हे बंदर जंगल उत्पादनांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. १६१८ मध्ये कझाकांनी या नदीचे प्रथम समन्वेषण केले, तर नदीच्या त्रिभुज प्रदेशाचे समन्वेषण १८७५ मध्ये स्वीडिश भूवैज्ञानिक नूर्देनशल्ड याने केले. उगमाकडून मुखाकडे किझिल, आबाकान, क्रॅस्नोयार्स्क, माल्काकोव्हा, तुरूखान्स्क, ईगार्का, डुर्डिका इ. नदीकाठावरील शहरे औद्योगिक व व्यापारकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.

क्षीरसागर, सुधा