लेओबेन : ऑस्ट्रियातील दाट लोकवस्तीच्या श्टायरमार्क (स्टिरिया) विभागात मूर नदीकाठावर वसलेले औद्योगिक शहर. लोकसंख्या ३१,९८९ (१९८७ अंदाज). आग्नेय ऑस्ट्रियाच्या मध्यभागी, ग्रात्सच्या वायव्येस ४४ किमी.वर वसलेल्या या शहराचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही. बोहीमियाचा राजा दुसरा ओटोकार याने त्याचे १२६३ मध्ये पुनर्वसन केले व त्यानंतर ते व्यापार मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून नावारूपास आले.

‘ऑस्ट्रियाचे रूर’ म्हणून प्रसिद्धी पावलेल्या आजूबाजूच्या प्रदेशात लोहखनिज, लिग्नाइट, ग्रॅफाइट, मॅग्नेसाइट इ. खनिजे आढळल्याने मूर नदीखोऱ्यात धातुउद्योग अकराव्या शतकापासून भरभराटीस आला. खाणकाम व त्यावर आधारित उद्योग यांच्या भक्कम पायावर येथील अर्थव्यवस्था आकार घेऊ लागली. चौदाव्या व पंधराव्या शतकांत लेओबेन लोहखनिजाच्या खाणकामाचे महत्त्वाचे केंद्र बनले. येथे साध्या शेती अवजारांबरोबरच हळूहळू विविध प्रकारची युद्धसामग्री आणि शस्त्रे यांचीही निर्मिती होऊ लागली. १८५४ मध्ये झेमेरिंग खिंडीतून व्हिएन्नाला जाणारा लोहमार्ग तयार झाल्यानंतर या काहीशा एकाकी पडलेल्या भागाचा देशातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या इतर प्रदेशांशी संपर्क आला व त्यातूनच ते महत्त्वाचे दळणवळण केंद्र बनले. दोनाव्हेट्स व गॉस या औद्योगिक उपनगरांचा १९३९ साली लेओबेनमध्ये समावेश करण्यात आला. दोनाव्हिट्स येथे झोतभट्ट्या असून तेथे अशुद्ध लोखंड व पोलाद तसेच पोलादी वस्तू यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. लोहनिर्मितीखेरीज यंत्रे, वस्त्रे व बीर तयार करणे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. जंगलावर आधारित लाकूडकटाई तसेच सेल्युलोज व कागद यांचे उत्पादनदेखील येथे होते. उद्योगांच्या विकासामुळे लोकांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मायनिंग अँड मेटॅलर्जी’ हे विद्यापीठ १८४० मध्ये स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय शहरात इतर तंत्र विद्यालयेही आहेत. डोंगराळ भागातील स्थानामुळे शहरात पर्यटन व्यवसायदेखील वाढीस लागला आहे.

ऐतिहासिक महत्त्वाच्या या शहरात अनेक मध्ययुगीन इमारती दिसतात. मारिया ॲम वासेन हे गॉथिक शैलीतील चर्च बाराव्या शतकातील असून पंधराव्या शतकात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या चर्चच्या खिडक्या काचचित्रांनी सुशोभित केलेल्या असून १६६०-६५ मध्ये बांधलेले पॅरिश चर्च आणि बेल टॉवर या वास्तू शहराचे भूषण ठरल्या आहेत.  

फडके, वि. शं.