व्हिशी : मध्य फ्रान्समधील खनिजयुक्त पाण्याच्या झर्यां साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या ३०,५२२ (१९८२). हे ठिकाण अल्ये नदीकाठी क्लेर्मॉफेरँ शहराच्या ईशान्येस सु. ४८ किमी.वर वसले आहे. फसफसणाऱ्या उष्ण खनिजोदकाच्या व त्यातील औषधी गुणांच्या झऱ्यांसाठी रोमन काळापासून हे स्थान प्रसिद्ध होते. मात्र मध्ययुगात ते दुर्लक्षित राहिले. मार्की द सेव्हीन्ये या प्रसिद्ध लेखिकेने इ.स. १६७६-७७ दरम्यान व्हिशीला भेट देऊन रोगमुक्त होण्यासाठी या पाण्याचा उपाय केला. तेव्हापासून या झऱ्यांची लोकप्रियता वाढली. तिसऱ्या नेपोलियनने त्यास अधिमान्यता दिली. विसाव्या शतकात येथे पर्यटकांची वर्दळ वाढली. व्हिशीच्या परिसरात एकूण नऊ झरे असून ह्यांपैकी सर्वांत मोठ्या झऱ्यातून दर दिवशी २,०३,८५२ ली. पाणी उपलब्ध होते. ह्यामुळे येथे बाटलीबंद खनिज पाण्याचा उद्योग भरभराटीत असून येथून जगभर त्याची निऱ्यात होते. हे सर्व झरे शासकीय मालकीचे आहेत. याशिवाय अल्ये नदीच्या काठी प्रशस्त बागा व पटांगणे असून ह्या भागात आलिशान उपाहारगृहे, स्नानगृहे आणि मनोरंजनाची दालनेही आहेत.

दुसऱ्या महायुद्धकाळात पॅरिसच्या रोखाने जर्मन फौजांनी आगेकूच करताच फ्रान्सचा पंतप्रधान पॉल रेनाँ याने राजीनामा दिला आणि उप-पंतप्रधानप फिलीप पेतँ पंतप्रधानपदी आला. या सुमारास जर्मन फौजा फ्रान्समध्ये घुसल्या होत्या. पेतँने शरणागती पत्करली व जर्मनीबरोबर शस्त्रसंधी घडवून आणली (२२ जून १९४०) आणि आपली राजधानी व्हिशी येथे हलविली (जुलै १९४०). पेतँने तिसरे प्रजासत्ताक बरखास्त करून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. सुरुवातीला फ्रान्सचे दोन विभाग होते. उत्तर व पश्चिम किनाऱ्यालगतचा भूभाग जर्मनव्याप्त होता. उरलेला फ्रान्स व फ्रेंच वसाहती पेतँच्या अखत्यारीत होत्या. जर्मनीला सहकार्य करण्याच्या तत्त्वावर श्रेणीसत्ताक राज्य (कॉर्पोरेटिव्ह स्टेट) बनविण्यात आले. या व्हिशी शासनास दोस्तांच्या फौजांनी मान्यता दिली नाही. दोस्तांच्या फौजांनी नोव्हेंबर १९४२ मध्ये उत्तर आफ्रिका पादाक्रांत केला. त्या वेळी ॲडॉल्फ हिटलरने १९४०चा शस्त्रसंधीचा करार रद्दबातल ठरवून पूर्ण फ्रान्सवर ताबा मिळविला. व्हिशी शासनास नाममात्र अस्तित्व होते. दोस्तांच्या फौजांनी हिटलरचा पराभव केल्यानंतर (१९४५) हे शासन संपुष्टात आले व पंतप्रधान पेतँ जर्मनीत पळून गेला.                                              

देशपांडे सु. र.