गुलमर्ग : जम्मू व काश्मीर राज्यातील बारमूला जिल्ह्यातील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या ५४३ (१९७१). हे श्रीनगरच्या ४६ किमी. पश्चिमेस आहे. श्रीनगर–तंगमर्ग हा ३९ किमी. मोटाररस्ता उत्तम असून त्यापुढील रस्ता चढणीचा आहे. समुद्रसपाटीपासून २,५९१ मी. उंचीवरील हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असून प्रवाशांनी नेहमी फुललेले असते. गोल्फ, बर्फावरील विविध खेळ, पोलो इत्यादींसाठी येथे क्रीडांगणे आहेत. नंगा पर्वत व वुलर सरोवर येथून फार सुरेख दिसतात.  

शाह, र. रू.