सिंद्री : भारतातील झारखंड राज्याच्या धनबाद जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या ७६,८२७ (२००१). धनबादच्या आग्नेयीस सु. १९ किमी.वर ते वसले आहे, सिंद्री लोहमार्ग व रस्त्याने इतर शहरांस जोडले आहे. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेंतर्गत येथे तत्कालीन बिहार राज्यशासनाने सार्वजनिक खत कारखाना उभारला (१९५१). शहराच्या व्यवस्थापनासाठी बिहार शासनाने अधिसूचित क्षेत्र समिती (नोटिफाईड एरिआ कमिटी) नेमली होती (१९५३). पुढे खताच्या अधिकतर उत्पादनासाठी ‘फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिडेट’ ही सार्वजनिक कंपनी स्थापन करण्यात आली (१९६१). अधिसूचित क्षेत्र समितीचे १३ सदस्य शासन नियुक्त असून, फर्टिलायझर कॉर्पोरेशनचा मुख्य हा समितीचा अध्यक्ष असे. या कंपनीने उत्पादन व कार्यक्षमता यांत लौकिक प्राप्त केला होता. आशियातील खतनिर्मितीच्या क्षेत्रातील ती एक मोठी व अग्रगण्य कंपनी होती आणि तिचे उत्पादन ३,५०,००० टन होते. त्यांपैकी सुपर फॉस्पेटचे वार्षिक उत्पादन १५,००० टन होते. कंपनीत ५,७२७ कर्मचारी होते (१९६२-६३). त्यांच्या निवासाची, तसेच आरोग्य व मनोरंजनाची सोय कॉर्पोरेशनने केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने राष्ट्रीय पातळीवर ‘द नॅशनल फर्टिलायझर्स लि.’ ही कंपनी स्थापन केली (१९७४). ती व द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांची भौगोलिक पार्श्वभूमी आणि भरणसाठा (फीड स्टॉक) यांचा विचार करुन चार स्वतंत्र कंपन्यांत पुनर्घटन करण्यात आले (१९७८). त्यांपैकी सिंद्रीची एक प्रमुख खत कंपनी होती. विकास व लोकसंख्यावाढीबरोबर त्याला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला.

सिंद्री शहराची औद्योगिकीकरणामुळे सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र प्रगती झाली. एक नमुनेदार, स्वच्छ, सुंदर आणि सुनियोजित शहर म्हणून त्याचा लौकिक झाला. तिथे फर्टिलायझर कॉर्पोरेशनला लागूनच आधुनिक कोक फॅक्टरी व ए. सी. सी. सिमेंट कारखाना काढण्यात आला आहे (१९६२). शहरात किंडरगार्टनपासून महाविद्यालयापर्यंतच्या तंत्रशिक्षणासह विद्यादान करणाऱ्या संस्था असून ‘द बिहार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ ही आय्. आय्. टी. दर्जाची अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था आहे. झारखंडच्या निर्मितीनंतर (२०००) तिचे नामकरण ‘बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ’ असे करण्यात आले. फर्टिलायझर कॉर्पोरेशनने कर्मचाऱ्यांसाठी एक कल्याण केंद्र सुरु केले असून त्यात मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच अंतर्गेही खेळ, ग्रंथालय, प्रौढ साक्षरता, विणकाम, शिवणकला, भरतकाम, ललित कला आदींचे शिक्षणप्रशिक्षण दिले जाते. यांशिवाय मैदानी खेळांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल असून त्यामध्ये ऑफिसर्स क्लब, यूथ क्लब यांतर्फे खेळांचे आयोजन, प्रशिक्षण दिले जात असे. त्यामुळे सिंद्रीतील अनेक तरुणतरुणींनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून सहभाग घेतला. कॉर्पोरेशन चलत १०० खाटांचे रुग्णालय आधुनिक सोयींनी सुसज्ज होते.

केंद्र शासनाच्या युरियाला मिळणाऱ्या उपदानावर कार्यरत असलेला सिंद्री खत कारखाना भरणसाठ्याची मर्यादा, वर्धन अक्षमता, सुरक्षितता आणि आर्थिक बोजा यांमुळे डबघाईला आला. त्यामुळे तो बंद करण्यात आला (२००२).

कुंभारगावकर, य. रा.