चंद्रभागा : (१) कृष्णेची उपनदी भीमा हिला पंढरपुराजवळ चंद्रकोरीसारखे वळण आहे. त्यावरून तेथे तिला चंद्रभागा म्हणतात.

  (२) वऱ्हाडातील पूर्णेची एक उपनदी. ही अमरावती जिल्ह्यात गाविलगडाच्या दक्षिण उतारावर उगम पावून ९५ किमी. दक्षिणेकडे वाहत जाऊन धामणी खुर्दजवळ पूर्णेस मिळते. हिच्या १,५२४ चौ.किमी. खोऱ्यातील अव्वल काळ्या जमिनीत कपाशीचे चांगले पीक येते.

(३)ऋग्वेदात उल्लेखिलेली असिक्नी व हल्लीची चिनाब नदी हिचे चंद्रा व भागा हे प्रवाह हिमालयात उगम पावून पुढे तंडी येथे एकत्र होतात व मग तिला चंद्रभागा म्हणतात.

(४) नर्मदा, तापी व साबरमती यांना मिळणाऱ्या तीन नद्यांनाही चंद्रभागा म्हणतात.

कुलकर्णी, गो. श्री. कुमठेकर, ज. ब.